आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणात गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांच्या हस्ते शोषखड्डा मोहिमेचा शुभारंभ

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाण येथे घर तिथे शोषखड्डा मोहिमेचा शुभारंभ गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांच्या हस्ते करण्यात आला. पुनर्वसन गावाठाणात शोषखड्ड्याचा प्रातिनिधिक स्वरूपात तंटामुक्ती अध्यक्ष मारुती कांबळे यांच्या घराच्या परिसरात जंगले यांच्या हस्ते शोष खड्ड्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी तथा प्रशासक पी. डी. जाधव, विस्तार अधिकारी श्रीमती कांबळे, ग्रामसेवक अनिल घुगे, आरोग्य सेविका ताई देशमुख, संचिता सावंत, रुचिता कांबळे,पोलीस पाटील यशवंत नागप, माजी सरपंच आकाराम नागप, डॉ जगन्नाथ जामदार, बयाजी जिनगरे, श्री. दळवी, बाळकृष्ण कांबळे, संतोष कदम, संतोष नागप, विलास नागप, मनोज नागप, यशवंत कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलतांना गटविकास अधिकारी जंगले म्हणाले, आपली ग्रामपंचायत नव्याने स्थापन झालेली आहे. सर्व ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपला गाव 100% शोषखड्डे पूर्ण करणारा गाव म्हणून नोंद झाली पाहिजे. यासाठी सर्वांनी आपला सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तर आमच्या या नवीन गावठाणात जवळपास 370 घरे आहेत.या प्रत्येक घराला शोष खड्डे मारून आमचा गाव यात 100 % यशस्वी करू, असे माजी सरपंच आकाराम नागप, डॉ जामदार यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.

error: Content is protected !!