वैभववाडीतील नेर्ले गावच्या भाजप सरपंच, उपसरपंचांसह शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
विनायक राऊत, वैभव नाईक, परशुराम उपरकर, सुशांत नाईक, नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
सिंधुदुर्गात पुन्हा शिवसेना पक्ष प्रवेशांना सुरुवात
कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या भाजप पक्षाच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे यांच्यासह शेकडो नागरिकांनी काल सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश घेऊन पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात भाजप पक्षाला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. माजी खासदार,शिवसेना नेते विनायक राऊत, माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला. शिवसेना नेत्यांनी भगवी शाल घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी विनायक राऊत म्हणाले, अनेक संकटे झेलून शिवसेना आजही उभी आहे. शिवसेना संपविण्याचा कोणीही कितीही प्रयत्न केला तरी शिवसेना संपणार नाही. भाजपच्या सत्ता काळात देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्हा एका कुटुंबाच्या हातात आपण दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची अपरिमित हानी झाली असून ड्रग्स, गांजा, दारू यासारख्या अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. पालकमंत्र्यांच्या मेहरबानीमुळे गोव्यातील कॅसिनो देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु झाला आहे. मुंबई गोवा महामार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही. वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत आहे. नागरिकांना गॅस, पेट्रोल, डिझेल मिळत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार पूर्णतः अपयशी ठरले असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.
वैभव नाईक म्हणाले, नेर्ले गावावर सत्ताधाऱ्यांकडून जो अन्याय झाला त्याला वाचा फोडण्यासाठी ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला हे कौतुकास्पद आहे. तुमचा निर्णय चुकला असे कधीही तुम्हाला वाटणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची एकहाती सत्ता आहे. परंतु कुठल्या गावाचा सर्वांगीण विकास झाला हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरु झालेल्या जलजीवन मिशन योजनेतील एकही काम आताच्या सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आले नाही हि वस्तुस्थिती आहे. आपल्या पंतप्रधानांची जागतिक पातळीवर काय प्रतिमा आहे हे देखील सर्वाना कळून चुकले आहे. देशात पेट्रोल डिझेल मिळत नसून सर्वच वस्तू महागल्या आहेत. अमेरिका सांगेल त्याच देशाकडून आपल्याला तेल खरेदी करावे लागते. उज्वला गॅस योजनेत १२ गॅस सिलेंडर गरीब महिलांना दिले जात होते ते प्रमाण आता ४ वर आले आहे.त्यामुळे गरीब महिलांवर सरकारकडून हा अन्याय असल्याचे त्यांनी सांगत याविरोधात आपल्याला आंदोलन करावे लागणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.
परशुराम उपरकर म्हणाले, शिवसेना हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. भाजपच्या सत्तेला नाकारून आपण सर्वजण शिवसेना पक्षात आलात. सत्ताधारी पक्ष अपयशी ठरतो तेव्हाच त्यांचे लोक विरोधी पक्षाकडे वळतात. कार्यकर्त्यांना वापरायचे आणि नंतर फेकून द्यायचे असा राणे कुटूंबाचा देखील इतिहास आहे. परंतु आपण आता शिवसैनिक झाला आहात. आपल्याला न्याय देण्याचे काम आम्ही करू. पालकमंत्री नितेश राणे सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहेत. सिंधुदुर्गातील अवैध धंदे त्यांना रोखता आले नाहीत. त्याची पुष्टी त्यांच्या भावानेच दिली आहे. नितेश राणेंनी यापूर्वी सुरु केलेल्या सर्वच योजना आणि प्रकल्प जसे बंद झाले तशीच त्यांनी सुरु केलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा देखील अवघ्या एका महिन्यात बंद पडल्याचे सांगितले. सुशांत नाईक म्हणाले, या पक्षप्रवेशाने नितेश राणे आणि भाजप सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पहिली चिंगारी वैभववाडी येथे पडली असून आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ती पसरणार आहे. शिवसेना एक विचाराने चालणारा पक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश केले जातात. परंतु आपण सर्वानी शिवसेना पक्षावर विश्वास दाखवून पक्षात प्रवेश केलात. आपला प्रवेश कोणत्याही स्वार्थासाठी नाही तर तत्वासाठी झाला आहे. मी आपल्या सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत करतो. आपल्या पाठीशी आम्ही कायम ठाम राहणार असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले. नीलम पालव म्हणाल्या, सिंधुदुर्गात पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रवेशांना सुरुवात झाली असून जुन्या नव्या सर्वांनी एकजुटीने पक्ष संघटना वाढीचे काम करावे.आता राज्यातील नागरिकांना भाजप- शिंदे सरकारवर विश्वास राहिलेला नाही. महागाईने जनता होरपळली आहे.गुन्हेगारी, भ्रष्टाचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र भरडला जात आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत सत्तापालट अटळ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे यांच्यासह ग्रा. पं. सदस्या शोभना जाधव, सिद्धी सुर्वे, सुप्रिया जाधव, रुपेश पांचाळ, माजी उपसरपंच मोहन हडशी, ग्रामस्थ मयूर सुर्वे, मनोज सुर्वे, भरत खानविलकर, सागर सुर्वे, रवीउदय पांचाळ, जयेश पांचाळ, जयवंत पांचाळ, अनंत कांबळे, सुधाकर पांचाळ, परेश पांचाळ, नितीन पांचाळ, गणेश पांचाळ, रत्नकांत सुर्वे, विश्वजित खानविलकर, विश्वनाथ पांचाळ, चंद्रकांत खानविलकर, अनंत निंबाळकर, महेश पांचाळ, गौरव सुर्वे, गुरुनाथ हडशी, भावेश हडशी, गुणाजी सुर्वे, अक्षय पांचाळ, समीर पांचाळ, अक्षय कुळये यांसह शेकडो नेर्ले ग्रामस्थांनी शिवसेनेचा भगवा झेंडा आणि मशाल हाती घेतली आहे. याप्रसंगी वैभववाडी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, तालुका संघटक गुलझार काझी, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, शाखाप्रमुख यशवंत खानविलकर, सोशल मीडिया प्रमुख विठोबा गुरव, सुरेश पांचाळ, संजना गावडे, भरत खानविलकर, वसंत खानविलकर, मयूर सुर्वे, रमाकांत मोरे, बाळा राऊत, भाऊ वळंजू, प्रसाद नारकर, यशवंत गवाणकर, जितेंद्र तळेकर, सूर्यकांत परब, रोहित पावसकर, नाना जैतापकर, सुरेश पांचाळ, ओमकार इस्वलकर, रिहाना काझी, नलिनी पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

















