तुमचेही हात दगडाखाली असतात याचे भान ठेवा… अधिकाऱ्यांनी आपल्या मर्यादा विसरु नये

माजी आमदार वैभव नाईकांवरील एट्रॉसिटी ऍक्ट गुन्ह्यावरून मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा इशारा

कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघातानंतर ग्रामस्थांचे उत्स्फूर्त रास्ता रोको आंदोलन झाले. अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा महामार्गावरील अवैध मिडलकट बंद केला गेला नाही. याच मिडलकटमुळे शाळकरी मुलांचा जीव गेला. या दुर्घटनेनंतर आंदोलनादरम्यान माजी आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात नॅशनल हायवेचे अभियंता श्री. साळुंखे यांनी एट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी तुमचेही हात दगडाखाली असतात. आपल्या मर्यादा विसरू नये, असा इशारा हायवे अधिकाऱ्यांना दिला आहे.

झाराप साळगाव येथील अपघाती मृत्यूनंतर लोकांनी हायवे प्राधिकरण अभियंत्यांना जाब विचारला. यावेळी सर्वपक्षीय नेते पुढारी व ग्रामस्थ उपस्थित होते. त्याच ठिकाणी माजी आमदारांनी रागाच्या भरात हायवे अधिकारी साळुंखे यांना मारहाण केल्याची तक्रार साळुंखे यांनी कुडाळ पोलिस स्टेशनमध्ये केली आहे. अधिकाऱ्याना मारहाण झाली त्याबाबत त्यांनी तक्रार द्यावी याबाबत कोणाचेही दुमत नाही. परंतु सबंधीत अधिकाऱ्याने त्या तक्रारीत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा जबाब दिला आहे. यामुळे पोलीसांनी शासकीय कामात अडथळा सोबत एट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. एट्रोसिटी बाबत कुडाळ पोलिसांना विचारले असता जसा जबाब दिला तसा गुन्हा दाखल केल्याचे सांगून, तपासात शहानिशा करुन निष्पन्न होत नसल्यास एट्रोसिटी कमी करणे संदर्भात निर्णय होईल असे सांगण्यात आले. उद्या तपासात एट्रोसिटी खोटी ठरल्यास, उलट सबंधीत साळुंखेवर खोटी व खोडसाळ तक्रार करुन यंत्रणेची दिशाभूल केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मनसेची मागणी आहे.

मुळात अधिकाऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने जातीवाचक एट्रोसिटी कायद्याचा आपली बचाव ढाल म्हणून गैरवापर करता कामा नये. भविष्यात कोणत्याही कार्यालयात लोकप्रतिनिधी, समाजसेवक, ग्रामस्थ जाऊन चुकी / अन्यायाबाबत विचारणा करतील तर अधिकारी, कर्मचारी अशा कायद्याचा वापर करून सर्वांनाच वेठीस धरतील. राजकारण सोडा पण ही गंभीर बाब आहे. जिल्ह्यात अशा चुकीच्या प्रथा कोणी चालू करू नये. त्या मुळीच खपवून घेतल्या जाणार नाहीत. अधिकाऱ्यांनी जरुर आपली बाजू मांडावी, न्यायासाठी विविध मार्गांचा अवलंब करावा. परंतु चुकीच्या माहिती सांगून अशा कायद्यांचा सहारा घ्याल, तर लक्षात असू द्या आपले हात सुद्धा नेहमी दगडाखाली असतात, असा सुचक इशारा परब यांनी दिला आहे.

error: Content is protected !!