न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट प्रशालेत अभिजात मराठी भाषा सप्ताह संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : अनेक वर्षाच्या सातत्यपूर्ण संघर्षातून व प्रयत्नातून आपल्या मराठी मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्याने सर्व मराठी भाषिकांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. आपली अभिजात मराठी भाषा ही संवाद, संभाषण व व्यवहारातून पुढे आली पाहिजे. अभिजात मराठी भाषेचे संवर्धन करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असे मत मराठी भाषा विषयाचे प्राध्यापक संतोष जोईल यांनी व्यक्त केले, व विद्यार्थ्यांना सुरेल गायनातून आपल्या कविता ऐकविल्या. मराठी भाषा मंडळांद्वारे आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ अंतर्गत व्याख्यान कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक पी. के. पारकर,मराठी विभाग प्रमुख वाघमोडे वृषाली पवार, आर्या भोगले, तुषार नेवरेकर आदि उपस्थित होते. या वेळी वृषाली पवार यांनी प्रास्ताविकातून अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करणे, या मागील महत्त्वपूर्ण भूमिका विषद करून मराठी भाषेची सद्यस्थिती उपस्थितांपुढे मांडली.

मुख्याध्यापक पारकर सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मराठी भाषेची थोरवी, विद्यार्थ्यांपुढे व्यक्त केली. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतूनच संवाद साधला पाहिजे. आपल्या मातृभाषेचे संवर्धन व जतन करणे. ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार आर्या भोगले यांनी मानले. कार्यक्रमाला प्रशालेचे शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त प्रशालेत ग्रंथ प्रदर्शन मांडण्यात आले होते प्रशालेचे विद्यार्थी शिक्षक व इतर मान्यवरांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला त्याचबरोबर हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या. निबंध स्पर्धा प्रथम आर्या रासम, द्वितीय रुत्वी सावंत तृतीय दीक्षा नानचे.
हस्ताक्षर स्पर्धा प्रथम समृद्धी आखाडे, द्वितीय ओम गोसावी, तृतीय दीक्षा सापळे यांना गौरविण्यात आले.प्रशालेच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सप्ताहास मनमुराद प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!