देवगड न्यायालयाच्या न्यायालयीन कोठडी आदेशाविरोधात देवगड पोलिसांचा रिविजन अर्ज मंजूर
अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : अनिकेत रामचंद्र लाड याला सुमारे 38 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा पान मसाला ताब्यात बाळगल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी अटक केली होती . आरोपी अनिकेत याला 9 ऑक्टोबर रोजी देवगड न्यायालयासमोर पोलीस कोठडी मिळण्याकरता हजर केले असता देवगड न्यायालयाने पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी नामंजूर करून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. देवगड न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरुद्ध देवगड पोलिसांनी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचे मार्फत जिल्हा सत्र न्यायालयात रिविजन अर्ज दाखल केला होता. त्या रिव्हिजन अर्जाची सुनावणी आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री देशपांडे यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी विविध दाखले देत युक्तिवाद केला. तोडकरी यांच्या युक्तिवादानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने देवगड न्यायालयाचा आरोपीला न्यायालयीन कोठडीचा निर्णय रद्द करत आरोपीला अनिकेत लाड याला 16 ऑक्टोबर पर्यंत 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.












