सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका – 2025 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. जिल्ह्यातील 3 नगरपरिषदेसाठी (सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला) आणि 1 नगरपंचायत (कणकवली) साठी 2 डिसेंबर, 2025 रोजी मतदान तर 3 डिसेंबर, 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी विनायक औंधकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका – 2025 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. 74 मतदान केंद्रावर मतदान होणार असून जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या 57 हजार 207 एवढी आहे. यामध्ये पुरुष मतदार 27 हजार 697 तर स्त्री मतदार 29 हजार 510 एवढे आहेत. आयोगाच्या निर्देशानुसार भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, फिरते सर्वेक्षण पथक तैनात करण्यात येणार आहेत. मतदानासाठी आवश्यक ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट तसेच बॅलेट युनिट असल्याचेही त्या म्हणाल्या.
जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितचे अनुषंगाने अंमलबजावणी करण्यात येत आहे. मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपद्वारे मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येणार आहे. मेळावे, कार्यक्रम, पथनाट्य, शाळा व कॉलेजमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.












