उमेदवारीसाठी एकही अर्ज दाखल नाही
कणकवली (प्रतिनिधी) : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. यात कणकवली नगरपंचायतीसाठी आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही. येथील तहसीलदार यांच्या दालनात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. दरम्यान अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची आज कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ उडाली होती. सोमवार १७ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत आहे.
कणकवली नगरपंचायतीसाठी तहसीलदार दीक्षांत देशपांडे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर मुख्याधिकारी गौरी पाटील ह्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. कणकवली नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर उमेदवारांनी येथील तहसील कार्यालयातील कक्षात ते दाखल करायचे आहे. रविवार सुट्टीचा दिवस वगळून १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यन्त नामनिर्देशन पत्र दाखल करायची मुदत आहे. त्यामुळे शक्यतो शेवटच्या दिवशीच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी होणार आहे. दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी १८ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. त्यानंतर अधिकृत उमेदवारांची यादी अपील असलेले उमेदवार सोडून जाहीर होईल. २५ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
कणकवली तहसीलदारांच्या दालनात उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी तसेच कागदपत्र पूर्ततेसाठी सहा टेबल लावण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतंत्र टेबल लावण्यात आले आहे. तर तीन टेबलवर प्रत्येकी चार प्रभाग व चौथ्या टेबलवर पाच प्रभागातून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. सहाव्या टेबलवर अनामत रक्कम तसेच इतर कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.












