दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार
खेडेगावातील स्वप्नपूर्ती अकॅडमी, करूळचे दैदिप्यमान यश
फोंडाघाट (प्रतिनिधी) : नुकत्याच पुणे बालेवाडी येथे पार पडलेल्या, क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य- पुणे, महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे, महाराष्ट्र राज्यस्तरीय जुदो स्पर्धेमध्ये स्वप्नपूर्ती अकॅडमी करूळच्या विद्यार्थिनी यशस्वी संतोष दिवेकर (२३ किलो) हिने तृतीय क्रमांक पटकावून ब्राँझ मेडलला गवसणी घातली. तर तन्वी संतोष पारकर (३६किलो) तिने सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक पटकावला..
करूळ, तालुका कणकवली येथील स्वप्नपूर्ती अकॅडमीच्या या विद्यार्थिनींनी निलेश बुधाजी फोंडेकर या मार्गदर्शक शिक्षक व सहकारी यांच्या अथक प्रयत्नातून, करूळ सारख्या खेडेगावातून मिळवलेले यश दैदिप्यमान आणि कौतुकास्पद आहे. या प्राविण्य प्राप्त मुली दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व करणार आहेत. फोंडाघाटची शार्प शूटर मनस्या फाले नंतर या मुलींनी फोंडाघाट, करूळ चे नाव दिल्लीवर फडकविले आहे. कुठलेही पाठबळ नसताना, करूळ सारख्या ग्रामीण भागात निलेश फोंडेकर यांच्या सुयोग्य मार्गदर्शनावर विश्वास ठेवत, अथक परिश्रम अन सरावाच्या जोरावर त्यांचे यश गाव-तालुका-जिल्ह्याचे नाव उंचवणारे आहे.
त्यांच्या यशाबद्दल यशश्री आणि तन्वीचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे. दिल्ली येथील स्पर्धेसाठी गावातील क्रीडाप्रेमी, खेळाडू, मार्गदर्शक, सहकारी आणि ग्रामस्थ यांनी दिल्ली येथील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.











