सावंतवाडी (प्रतिनिधी) : जगभरात ‘अतिशय दुर्मिळ’ आणि ‘धोक्यात’ म्हणून घोषित असलेल्या खवले मांजराला आंबोली येथे नवजीवन मिळाले आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या या प्राण्याचा वनविभागाच्या जलद कृती दलाने धाडसी बचाव केला आणि त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात परत सोडले.
आंबोलीतील रेनहिल्स हॉटेलच्या परिसरात कुत्र्यांनी एका खवले मांजराला पकडल्याची माहिती मिळताच, वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले. जलद कृती दलातील प्रथमेश गावडे, संग्राम पाटील, बदाम राठोड, कल्पेश परब आणि प्रफुल गावडे यांनी मिळून कौशल्याने या प्राण्याची सुटका केली.
बचावल्यानंतर खवले मांजराला तत्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्याची प्रकृती स्थिर झाल्यावर त्याला मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांच्या उपस्थितीत पुन्हा जंगलात सोडण्यात आले.
वनविभागाच्या या तत्पर आणि संवेदनशील कृतीमुळे वन्यजीव संरक्षणावरील त्यांची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे. खवले मांजर ही अत्यंत दुर्मिळ प्रजाती असून, अंधश्रद्धा आणि बेकायदेशीर तस्करीमुळे जगभरात त्यांचा संख्येने ऱ्हास होत आहे. आंबोलीतील या यशस्वी बचावामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, प्रथमेश गावडे यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्थानिक नागरिकांनीही अशा दुर्मिळ जीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.











