वैभववाडी (प्रतिनिधी) : बुद्ध हा वाङमयाचा पहिला महत्त्वाचा समीक्षक असून प्रतिक पवार यांची कविता बुद्धाच्या समीक्षेच्या प्रणालीवर आधारित समताधिष्ठित सामाजिक पुनर्रचनेचा एक विचार आहे असे प्रतिपादन बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक प्रा. आनंद देवडेकर यांनी हेतकर्स पब्लिकेशनच्या कवी प्रतिक स्मिता उत्तम पवार यांच्या ‘पुस्तकांना का घाबरतात माणसं? या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात केले.
सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग आणि रुईया मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कवी प्रतिक स्मिता उत्तम पवार यांच्या, हेतकर्स पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘पुस्तकांना का घाबरतात माणसं?’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच माटुंग्यातील रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. सदर काव्यसंग्रहाचे प्रकाशन बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक व सद्धम्म पत्रिकेचे संपादक प्रा.आनंद देवडेकर यांच्या हस्ते झाले. या काव्यसंग्रहावर भाष्य करण्यासाठी चर्चा सत्रात चर्चक म्हणून रुईया महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिल्पा नेवे, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. श्रीधर पवार, मराठवाड्यातील कवी, साहित्यिक प्रा. रामप्रसाद वाव्हळ आणि प्रकाशक शिलालेखकार सुनील हेतकर यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाची सुरुवात कवी प्रतिक पवार यांच्या ‘चल बंड करू’ या गीताच्या प्रक्षेपणाने झाली. तर ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक ज.वि.पवार, सिने अभिनेत्री, लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे, देवगिरी महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. समिता जाधव व युवा गझलकार अविनाश काठवटे यांच्या शुभेच्छापर व्हिडिओंचे प्रक्षेपण करण्यात आले. रुईया महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सई कदम आणि आभा भोसले या विद्यार्थिनींनी काव्यसंग्रहातील काही कवितांचे अभिवाचन करून वातावरण भावनिक केले.
कवी प्रतिक पवार यांच्या कवितेला शाहिरी बाजाची झालर असून ती लोकशाहीपूरक विचार प्रभावीपणे पेरते, असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष व ‘सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने’ या काव्यसंग्रहाचे कवी प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांनी काढले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सुत्रनिवेदक राजेश कदम यांनी आपल्या दमदार शैलीत केले. युवा कार्यकर्ती स्नेहल तांबे हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर रुईया महाविद्यालयाची विद्यार्थिनी रक्षिता घोले हिने कार्यक्रमात आभाराचे सूत्र सांभाळले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग यांचे सर्व पदाधिकारी, रुईया महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुश्री लोकूर, उपप्राचार्य डॉ. वैभवी पळसुले, मराठी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका आश्लेषा राणे आणि वाङ्मय मंडळाच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.













