सिंधुदुर्गात महायुती चा उद्या होणार फैसला – प्रमोद जठार
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात भाजपासोबत महायुती ची चर्चा करायची मात्र रत्नागिरीत शिवसेनेकडून मैत्रीपूर्ण लढतीची तयारी केली जात आहे. ही बाब शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्याकडे भाजपा संघटनमंत्री शैलेंद्र दळवी यांनी ओरोस येथील भेटीत मांडली. सिंधुदुर्गात निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. सिंधुदुर्गात माझ्यासह निवडणूक प्रभारी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा संघटक शैलेंद्र दळवी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक मनिष दळवी यांच्या कोअर कमिटी ने जिल्ह्यातील चारही नगरपरिषद साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. एकूण 77 नगरसेवक व 4 नगराध्यक्ष पदासाठी 350 हून अधिक इच्छुक उमेदवार आहेत. इच्छुकांच्या काल मुलाखती घेतल्या असून भाजपा प्रदेश कार्यकरिणीकडे आज सायंकाळी अहवाल सुपूर्त करणार आहोत. 14 नोव्हेंबर पासून भाजपाच्या उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल केले जाईल असे भाजपा निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ओरोस येथील भाजपा जिल्हा कार्यालयात शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी महायुती बाबत भेट घेऊन चर्चा केली. भाजपा नेत्यांची इच्छा आहे की निवडणूकीत महायुती व्हावी. मात्र कार्यकर्त्याचे स्वबळावर लढावे अशी मागणी आहे. सिंधुदुर्गात शत प्रतिशत भाजपा करण्यासाठी स्वबळावर लढावे असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत महायुती बाबत ठोस निर्णय घेतला जाईल असे जठार म्हणाले.












