“बाळासाहेबांचे विचारच आमची ताकद” – संदेश पारकर
कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या स्मृतिदिन कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तसेच शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर आणि विधानसभा प्रमुख सतीश सावंत उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना संदेश पारकर म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क दिला. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी दिलेला त्यांचा लढा आजही प्रेरणादायी आहे. असे बलाढ्य नेतृत्व पुन्हा महाराष्ट्रात होणे कठीण आहे.”
ते पुढे म्हणाले की बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र व हिंदू समाज एकजूट राहील आणि त्यांच्या विचारधारेवर चालत राहील. उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच बाळासाहेबांच्या तत्वज्ञानाचे खरे वारसदार असून जनता त्यांच्या पाठीशी उभी असल्याचा विश्वासही पारकर यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात उपतालुकाप्रमुख जितू कांबळी, तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, तालुका संघटक राजू राठोड, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, जगन्नाथ आजगावकर, सी. आर. चव्हाण, सिकंदर मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य हेलन कांबळे, अनंत कदम, प्रवीण कोलगावकर, आशिष कांबळे, राजू राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिकसह राजू राठोड मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मृतिदिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमातून शिवसैनिकांमध्ये नवीन ऊर्जा व उत्साह संचारला असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला पुढे नेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.












