विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील हुंबरट गावातील प्रसिद्ध असलेला श्री पावणादेवीचा जत्रौत्सव यंदा २० नोव्हेंबर २०२५ रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्साहात साजरा होणार आहे. पहाटे सुवर्णाचे ताट दर्शनापासून ते रात्री पंचारत व दशावतारी नाटकापर्यंत दिवसभर भक्तीमय वातावरणाची अनुभूती भाविकांना मिळणार आहे.
पहाटे ५ वाजता सुवर्णाचे ताटाच्या दर्शनाने जत्रौत्सवाची सुरुवात होईल.दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत देवांचे डाळप फेरी पारंपरिक जल्लोषात काढण्यात येईल. सायंकाळी ६ वाजता पावणादेवी मंदिरात देवांचे आगमन व स्वागत करण्यात येईल.सायंकाळी ७:३० वाजल्यापासून मान्यवरांचे स्वागत, आभार प्रदर्शन, देवीची ओटी भरणे व नवस फेडणे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप होणार आहे.
रात्रौ १२ वाजता पारंपरिक दशावतारी नाटकाचे आयोजन तर रात्रौ १ वाजता पंचारताच्या कार्यक्रमाने दर्शन सोहळा अधिक मंत्रमुग्ध करणारा ठरणार आहे.. त्यानंतर सकाळी पारंपरिक विधींसह कार्यक्रमाची सांगता होईल.
परंपरेनुसार प्रतिवर्षाप्रमाणे साजरा होणाऱ्या श्री पावणादेवीच्या यात्राेत्सवास भाविक भक्तांनी उपस्थित राहुन कार्यक्रमांची शाेभा वाढवावी असे आवाहन श्री देव बाणकीलिंग पावणाईदेवी न्यास, हुंबरट ग्रामविकास मंडळ मुंबई, देवस्थान मानकरी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.












