फोंडाघाट महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील राष्ट्रीय कॅडेट कोअर (NCC) विभागाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताच्या लोकशाही परंपरेचा महत्वाचा टप्पा असलेला संविधान दिन विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता हा निर्माण करण्याच्या उद्देशाने साजरा झाला.

लेफ्टनंट डॉ. राज ताडेराव यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले. त्यांनी म्हटले की, “आजचा दिवस हा भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठे आणि सर्वसमावेशक संविधान आहे. विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र आणून राष्ट्रनिर्मितीचे कार्य संविधानाने केले आहे.” तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांची आणि कठोर परिश्रमांची त्यांनी विशेष उल्लेखाने आठवण करून दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये व राष्ट्राच्या प्रगतीतील त्याच्या योगदानाविषयी मनोगत व्यक्त करून NCC विभागाने संविधान दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दलचे ज्ञान, अभिमान आणि कर्तव्यनिष्ठा वाढविण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्याने संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान दिन उपक्रमांतर्गत दि. 26 नोव्हेंबर, 2025 ते दि. 26 जानेवारी, 2026 या कालावधीत विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत सूचित केल्यानुसार महाविद्यालयात त्यांचे आयोजन करण्यात येणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी संविधानाचे सामूहिक वाचन करून लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन कोमल जोईल हिने केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!