दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत सलग दुकानफोडींचा सिलसिला घडवून आणला आहे. दोडामार्ग–साटेली भेडशी या विस्तृत परिसरात एकाच रात्रीत अनेक दुकाने तसेच एका खाजगी दवाखान्यात चोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरट्यांनी सर्वप्रथम दोडामार्ग बाजारपेठेत धाड टाकत चिकन सेंटरसह आणखी एका दुकानाची फोडाफोड केली. त्यानंतर आंबेली येथील गॅरेज, तर साटेली-भेडशी परिसरातील दुकान व खाजगी क्लिनिकमधून रोकड आणि साहित्य लांबवले. हे सर्व प्रकार नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, झरेबांबर येथे मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. कोल्ड्रिंक्सच्या दुकानात चोरीसाठी शिरलेल्या एका अल्पवयीन मुलाला स्थानिकांनी रंगेहाथ पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला समज देऊन सोडले आहे.
झरेबांबर येथे पकडलेल्या अल्पवयीन चोरट्याचा तालुक्यातील इतर चोरीच्या घटनांशी काही संबंध आहे का? याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. पोलिस तपास सुरु आहे.











