मुंबई विद्यापीठाच्या २०व्या आविष्कार स्पर्धेत फोंडाघाट महाविद्यालयाचा गौरव

नीता धुरी व श्रुती ढवण यांची मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ आयोजित २ वी आंतरमहाविद्यालयीन आविष्कार संशोधन स्पर्धा २०२५/२६ सिंधुदुर्ग झोनल फेरी नुकतीच कणकवली कॉलेज, कणकवली येथे उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील संशोधक विद्यार्थ्यांनी आपले नवोन्मेषी संशोधन प्रकल्प सादर करत संशोधन क्षमतांचे प्रभावी प्रदर्शन केले. या स्पर्धेत कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील नीता दिलीप धुरी, श्रुती दिपक ढवण या विद्यार्थिनींनी प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेला संशोधन प्रकल्प झोनल फेरीत ठळकपणे चमकला. पदवी स्तरावरील मानव्यविद्या, भाषा व ललितकला या विभागात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून सुमारे ३० संशोधन प्रकल्प सादर केले गेले. त्यापैकी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या दोन प्रकल्पांमध्ये फोंडाघाट महाविद्यालयाच्या ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वयंसहायता बचत गटांच्या विकासात CMEGP योजनेची भूमिका’ या विषयावरील संशोधन प्रकल्पाचा समावेश आहे. जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक-सामाजिक सक्षमीकरणात स्वयंसहायता गटांची मोलाची भूमिका तसेच CMEGP योजनेंतर्गत उभारल्या गेलेल्या उपक्रमांचे सर्वंकष विश्लेषण या प्रकल्पात करण्यात आले होते.

विद्यार्थिनींची अभ्यासपूर्ण मांडणी, प्रभावी सादरीकरण, संशोधनातील तथ्याधिष्ठित दृष्टिकोन आणि जिल्ह्यातील विकासप्रक्रियेचा घेतलेला सखोल वेध यामुळे परीक्षकांनी प्रकल्पाचे विशेष कौतुक केले. परिणामी, दोन्ही विद्यार्थिनींची दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली असून संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. सतीश कामत यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या
विशेष कार्याधिकारी (OSD) डॉ. मीनाक्षी गुरव, संस्थेचे पदाधिकारी,सर्व संचालक व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी कु. नीता धुरी व कु. श्रुती ढवण आणि त्यांचे संशोधक मार्गदर्शक प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांचे अभिनंदन करून अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!