खारेपाटण आठवडा बाजारामध्ये अज्ञात चोरट्यांकडून ६ मोबाईल चोरीला

खारेपाटण (प्रतिनिधी) : शनिवार हा दिवस खारेपाटणचा आठवडा बाजार दिवस असल्यामुळे खारेपाटण दशक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठेमध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र आज शनिवार दिवशी भरलेल्या आठवडी बाजारात सकाळी ११.०० च्या दरम्यान बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या विविध ग्राहकांचे एकूण ६ मोबाईल हँडसेट एकाच वेळी चोरीला गेल्याने खारेपाटणमध्ये ग्राहक, व्यापारी आणि नागरिक यांच्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती स्थानिक भाजी विक्रेता व्यापारी किशोर पिसे यांनी दिली. तर ज्या व्यक्तीचे मोबाईल बाजारमध्ये चोरीला गेले त्यामध्ये यशवंत रघुनाथ कोकाटे (बांदिवडे), संतोष सूद (तळगाव), बापू हरयाण (रिक्षावाले, केळवली) यांसह पंचक्रोशीतील दोन महिला ग्राहक व एक पुरुष ग्राहक असे एकूण सहा व्यक्तीचे मोबाईल आज शनिवारी खारेपाटण आठवडा बाजारामध्ये चोरीस गेल्याचे नागरिकांचा निदर्शनास आले. दरम्यान चोरीच्या घटनेची माहिती मिळताच खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस प्रमुख मिलिंद देसाई यांच्यासह सहकारी पोलिस यांनी खारेपाटण आठवडा बाजारला तातडीची भेट देऊन पाहणी केली व मोबाईल चोरीच्या घटनेची माहिती जाणून घेतली.

खारेपाटण आठवडा बाजार शनिवार दिवशी असल्याने बाजारामध्ये मोठी गर्दी असते. खेड्यापाड्यातील नागरिक आठवडाभर पुरेल एवढे सामान बाजारातून खरेदी करून घेऊन जात असतात. खारेपाटण आठवडा बाजार हा मच्छीमार्केट रोडला लिकी येथील मोकळ्या मैदानात ग्रामपंचायतीच्या व्यवस्थापनाखाली नागरिकांच्या सोयी करीता भरविण्यात येतो. मात्र आठवडा बाजारमध्ये येणारे ग्राहक व बाहेरील व्यपारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे आवश्यक सोयी सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर खारेपाटण शनिवार हा आठवडा बाजार दिवस असल्यामुळे नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या दिवशी वाहनाची सुद्धा गर्दी वाढत असल्याने वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसची सुद्धा आवश्यकता आहे. तसेच आठवडा बाजार ठिकाणी ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असणे आवश्यक आहे. तसेच अत्यावश्यक बाब म्हणून आठवडा बाजार याठिकाणी आरोग्य पथक देखील तैनात ठेवणे गरजेचे आहे. अशा प्रकारची मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. या मोबाईल चोरीच्या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी करत आहेत.

error: Content is protected !!