पाडलोसची सानिका गावडे बनली महाराष्ट्राची बाल ग्रामविकासमंत्री

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेच्या मानाचा तुरा : ओम गणेश बालसभेमुळे सावंतवाडीला मिळाले बाल मंत्रिपद

बांदा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग यशदा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बाल दिनानिमित्त पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय बाल संसदेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाडलोस गावातील सानिका रामा गावडे हिची सिंधुदुर्गची प्रथम बाल सरपंच तथा महाराष्ट्राच्या बाल ग्रामविकास मंत्रीपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सानिका गावडे या उमेदच्या पीआरआई सीबीओ कनवर्जन  प्रोजेक्ट अंतर्गत स्थापन ओम गणेश बालसभेची अध्यक्ष आहे. या उपक्रमात महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमधील 102 गावातील बालकांनी सहभाग घेतला होता. राज्यातील सहा विभागातून बारा बाल प्रतिनिधींची निवड करण्यात आली होती. त्यातून बाल मुख्यमंत्री, बाल विधानसभा अध्यक्ष, बाल विरोधी पक्षनेता आणि विविध खात्यांच्या बाल मंत्र्यांची निवड करून प्रत्यक्ष संसदीय कामकाजाच्या धर्तीवर बाल संसद पार पडली.

या संसदेत बाल प्रतिनिधींनी शिक्षण, आरोग्य, पाणी, स्वच्छता, पोषण आणि बाल सुरक्षा यांसारखे प्रश्न मांडले. मिनी मंत्रालयाच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थी काही काळ प्रत्यक्ष मंत्रिमंडळ आणि संसदेच्या कामकाजात सहभागी झाल्याचा अनुभव घेऊ शकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्र्यांनी बालमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास बाल हक्क आयोग अध्यक्ष एडवोकेट संजय पुराणिक, सदस्य मिलन जंगम, गीतांजली बुटी, संजय लाखे पाटील, प्रवीण भुजडे तसेच युनिसेफ व यशदाचे वरिष्ठ अधिकारी महिला बालविकास वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तर बालस्नेही महाराष्ट्र निश्चितच घडेल

बालकांचा आवाज हा त्यांच्या हक्कांचा अविभाज्य भाग आहे. विकसित महाराष्ट्र २०४७ चे स्वप्न साकार करताना आजच्या बालकांना निर्णयप्रक्रियेत सहभागी होणे हे किती महत्वाचे आहे हे आजच्या बाल संसदेवरून दिसून आले आहे. ‘माझे हक्क, माझा आवाज… विकसित महाराष्ट्राचा ध्यास’ ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरली, तर बालकांच्या सहभागातून अधिक संवेदनशील, समताधिष्ठित आणि बालस्नेही महाराष्ट्र घडविण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या मिलन जंगम यांनी व्यक्त के

बाल संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मांडलेले प्रश्न केवळ प्रातिनिधी स्वरूपात न ठेवता ते संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवून सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करेल.

  • अदिती तटकरे, महिला व बाल विकास
    मुलांच्या मागण्या आणि बाल संसदेत झालेल्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मुख्यमंत्री तसेच संपूर्ण मंत्रिमंडळापर्यंत पोहोचविण्यात येतील. बाल संसदेच्या माध्यमातून आता बालशक्तीकडे वाटचाल करण्याची गरज आहे.
  • संजय पुराणिक, अध्यक्ष, बालहक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र
error: Content is protected !!