सलग दुसऱ्या पुरस्काराने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा
कणकवली (प्रतिनिधी) : रक्तदान क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असलेल्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेत दैनिक प्रहारच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचा विशेष सन्मान करण्यात आला. शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी कणकवली प्रहार भवन येथे हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे , पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे , सौ.नीलम राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल,शिवसेना उपनेते संजय आग्रे, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, दैनिक प्रहारचे संपादक संतोष वायंगणकर तसेच अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यात रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे, रक्तदात्यांचे संघटन करणे आणि रक्तदानाबाबत जनजागृती करणे अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये संस्था सक्रिय आहे.
विशेष म्हणजे, चालू वर्षात संस्थेला मिळालेला हा सलग दुसरा पुरस्कार असून, संस्थेच्या सामाजिक कार्याची ही महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय संस्थेशी जोडलेले सर्व रक्तदाते, जिल्हा व तालुका प्रतिनिधी, जिल्हा व तालुका सल्लागार तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतकांना जाते, अशी भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
या सन्मानामुळे संस्थेच्या सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी आणि रक्तदात्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही रक्तदान क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.












