वैभववाडी (प्रतिनिधी) : स्वतंत्र कोकण राज्य अभियान यांच्यावतीने वैभववाडी तालुक्यातील मौदे गावचे सुपुत्र अनंत यशवंत मौदेकर यांना कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आझाद मैदान मुंबई येथील पत्रकार भवनामध्ये आयोजित सोहळ्यात संजय कोकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अनंत मौदेकर यांनी 1977 पासून विविध वृत्तपत्रांतून ग्रामीण भागातील तसेच मुंबई शहरातील समस्यांवर लेखन केले आहे. गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळी विविध वृत्तपत्रातून कामगारांच्या बाजूने निर्भीड व सडतोड लेखन केले आहे. याआगोदर त्यांच्या लिखाणाची दखल घेऊन महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक सेवा संघाकडून मुंबई महापौर यांच्या हस्ते त्यांना जागरूक नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघांकडून महाराष्ट्र दीप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई महानगर पालिकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी मौदे गावचे उपसरपंच, सरपंच म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांना झालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.










