शिकारीच्या नादात बंदुकीच्या छेऱ्याने खून झाल्याच्या गुन्ह्यात आरोपीचा जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : शिकारीच्या नादात स्वतःजवळील बंदूकीतील छेरे छातीत लागून मृत्यूस कारणीभूत झाल्याच्या गुन्ह्यातील आरोपी सिप्रियान डांटस याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. सिप्रियान डांटस याने आपल्या ताब्यातील बंदुकीचा बार शिकारीसाठी चालवला होता. तेव्हा बंदुकीतील छेरे छातीत लागून सचिन सुभाष मर्गज हा मयत झाला होता. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना 5 डिसेंबर 2025 रोजी घडली होती. या गुन्ह्यात आरोपी सिप्रियान डांटस याला 6 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपी सिप्रियान डांटस याने जामिनावर मुक्त होण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्याला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी हरकत घेत पुढील मुद्दे मांडले. आरोपी आणि मयत यांच्यासोबत अन्य कोणी साथीदार होते काय याबाबत तपास सुरू असून जामीन मिळाल्यास आरोपी सिप्रियान डांटस साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, आरोपिकडे स्पोर्टस शस्त्र परवाना असून एकूण तीन शस्त्रांची नोंद आहे, आरोपीने स्पोर्ट्स शस्त्र परवान्याचा शिकारी साठी दुरुपयोग केला आहे, आरोपी साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, आरोपी मयताच्या कुटुंबियांवर दबाव आणू शकतो, या गुन्ह्यात आरोपी
सिप्रियान डांटस याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पोलीस तपासात सिद्ध होत आहे. सरकारी वकील रुपेश देसाई यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी आरोपी सिप्रियान डांटस याचा जामीन अर्ज फेटाळला.

error: Content is protected !!