मालवण (प्रतिनिधी) : कै. स्नेहलता आत्माराम अंधारी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त अप्पा अंधारी परिवार कट्टा आयोजित ‘आई’ या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, ८वी ते १२वी च्या मुलांसाठी, विठ्ठल मंदिर कट्टा येथे दिनांक ३१ डिसेंबर रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधून उत्कृष्ट आठ स्पर्धकांनी भाग घेतला होता. अत्यंत भावनिक असलेल्या विषयावर, आईशी असलेल्या अनेक नात्यांचा उलघडा सर्वच स्पर्धकांनी अत्यंत कमी वेळात, विस्तृतपणे सुंदररीत्या केला.
स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये २१०१/-₹ ची मानकरी श्रावणी रूचिरा राजन आरावंदेकर रा.वेतोरे, तालुका कुडाळ ही ठरली तर द्वितीय क्रमांकचे बक्षीस रुपये १५०१/- पार्थ स्वाती प्रदीप सामंत राहणार मालवण याला मिळाले, तृतीय क्रमांकाचे बक्षीस रुपये १००१/- नैतिक रीना निलेश मोरजकर राहणार बांदा याला मिळाले. तीनही स्पर्धकांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण किशोर भिसे, भरत भोगटे व शेखर अंधारी यांचे हस्ते करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षण वराडकर हायस्कूल कट्टाचे शिक्षक संजय पेंडुरकर तसेच फोंडाघाट कॉलेजचे प्रोफेसर जगदीश राणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विमल पडवळ-करवडे यांनी केले. स्पर्धेसाठी अल्पोपहाराची व्यवस्था लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांनी केली. स्पर्धा संकल्पना प्रास्ताविक ऍड. दीपक अंधारी यांनी केले. आभार प्रदर्शन माधवी अंधारी जोशी हिने केले.












