चर्चा आणि चिंतन संमेलनात विचारवंत रमजान दर्गा यांचे परखड प्रतिपादन
जनवादी साहित्य संस्कृती चळवळ आणि नाथ पै सेवांगणतर्फे आयोजन
मालवण (प्रतिनिधी) : साहित्य लेखन म्हणजे समाजाचे हित साधणारी कृती. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे साहित्यच समाजाला पुढे घेऊन जाऊ शकते.त्यामुळे व्यवस्थेला प्रश्न विचारणे ही सुद्धा साहित्यिकांची जबाबदारी आहे.
असे प्रतिपादन धारवाड येथील लिंगायत धर्माचे अभ्यासक आणि विचारवंत रमजान दर्गा यांनी केले. ते जनवादी साहित्य संस्कृती चळवळ आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांनी आयोजित केलेल्या चर्चा आणि चिंतन संमेलनाचे उद्घघाटक म्हणून बोलत होते.
मालवण सेवांगणच्या सभागृहात ज्येष्ठ लेखिका आणि स्त्रीवादी अभ्यासक संध्या नरे पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या मंचावर सेवांगणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर, जनवादी सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष संपत देसाई, सचिव अंकुश कदम उपस्थित होते. तर यावेळी कादंबरीकार प्रवीण बांदेकर, कथा लेखक आसाराम लोमटे, कवी अजय कांडर, राजकीय विश्लषक प्रा.सचिन गरुड, ज्येष्ठ लेखिका प्रतिमा जोशी, किशोर जाधव, कवयित्री नीलम यादव, प्रज्ञा मातोंडकर, मधुकर मातोंडकर, महेश पेडणेकर, मिलिंद माटे (गोवा), कृष्णा पाटील, सुधीर नलवडे (तासगाव) श्रीधर चैतन्य, नितीन साळुखे (सातारा), वंदन जाधव, प्रसाद घाणेकर, प्रा. फातर्फेकर, पद्मा फातर्फेकर, सुभाष कोरे (कोल्हापूर) राजेंद्र कांबळे योगेश सकपाळ यांच्यासह सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लेखक, कवी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमजान दर्गा, म्हणाले भारतात नव्हे तर संपूर्ण जगात श्रमिक आणि कष्टकऱ्यांची बाजू घेवून पहिल्यांदा बसवेश्वर उभे राहिले. खऱ्या अर्थाने ते वर्किंग क्लासचे जगातील पहिले नेते आहेत. श्रमाला प्रतिष्ठा देत त्यांनी जाती उतरंडीला विरोध केला. भारतातील पहिला आंतरजातीय विवाह घडवून आणून जातीव्यवस्थेला धक्का दिला. आज आपल्याकडे लोकशाही व्यवस्थेत स्त्रियांना आरक्षण मिळत असले तरी अनुभव मंटपात ३२ स्त्रियांना प्रतिनिधित्व देवून त्यांनी स्त्रियांचा सन्मान घडवून आणला.
डॉ. बाबासाहेबांचे भारताच्या उभारणीतील योगदान सांगताना ते म्हणाले कि बाबासाहेब समजून घेतल्याशिवाय आपल्याला संविधान समजणार नाही. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन करून भारताच्या मुक्ती लढ्याचा पाया घातला. इथले जातीय शोषण आणि स्त्री शोषण मनुस्मृतीने घालून दिलेल्या आचारसंहितेवर चालत होते. त्याचेच दहन करून बाबासाहेबांनी धर्मग्रंथांच्या आधारे गुलाम केलेल्या भारतातल्या सर्व जातींना आणि स्त्रियांना मुक्तीचा मार्ग दाखविला.
संध्या नरे पवार म्हणाल्या, संस्कृतीची निर्मिती हि एक सामुहिक प्रक्रिया असते. ती नीटपणे समजून घेतली तर त्यातील विविध कंगोरे आपल्याला लक्षात येतील. नेमकी कोणती संस्कृती मानवमुक्तीची हे एकदा आत्मसात केले कि सांस्कृतिक चळवळ आपल्याला कोणत्या दिशेने न्यायचीयाची स्पष्टता येते. त्यामुळे या शिबिराचे आयोजन आजच्या काळासाठी अत्यंत महत्वाचे आहे. यावेळी सेवांगणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांनीही मनोगतात अशा शिबिरांची आज सर्वात जास्त गरज असून सेवांगण त्यासाठी कायम मदतीसाठी तयार आहे.
कॉ. संपत देसाई म्हणाले कि साहित्य हे परिवर्तन करेलच असे नाही पण परिवर्तनाची दिशा दाखवू शकते पण ते कोणते साहित्य याचे भान कार्यकर्ते आणि नव्याने लिहू पाहणाऱ्या लेखक कवींनी यावे, वैचारिक स्पष्टता यावी, सिद्धांत आणि साहित्य यांचा सहसंबंध स्पष्ट व्हावा या हेतूने हे चर्चा चिंतन संमेलन आयोजित केले गेले.
मधुकर मातोंडकर यांनी स्वागत केले तर सूत्रसंचालन महेश पेडणेकर यांनी केले.