सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते शुभारंभ
नवी कुर्ली ग्रामविकास मंडळातर्फे वह्यांचे वाटप
फोंडाघाट (प्रतिनिधी) : “ समाजवेध संकल्प प्रतिष्ठान ” च्या माध्यमातून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती मार्गदर्शक वर्गाचा शुभारंभ आज माजी सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे झाला. यावेळी बोलताना, आजचे युग हे स्पर्धेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात अपडेट राहून आपली स्वतंत्र वाट शोधली पाहिजे. आणि जीवनात यशस्वी व्हावे असे आवाहन माजी सभापती मनोज रावराणे यांनी केले, श्री रावराणे पुढे म्हणाले, की मळकटलेल्या पाऊलवाटेने सर्वच जातात,पण जो स्वतःची वाट शोधून स्वबळावर आणि बुद्धी सामर्थ्याने पुढे जातो,तोच आपल्या जीवनात यशवंत होतो. एखाद्याकडे खूप संपत्ती असते. कुणी आपली संपत्ती जमीन- बंगला यामध्ये गुंतवतो. पण आपल्या निवृत्तीनंतर सामाजिक भावनेने आपली सामाजिक बांधिलकी, विद्या- धनात गुंतवतो, तोच खरा समाजवेधक असतो.श्री विद्याधर तांबे आपल्या सेवानिवृत्तीनंतर समाजाचे ऋण म्हणून अशा समाजसेवेत संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थी आणि समाज रचनेचा मूलभूत पाया असलेल्या शैक्षणिक विचारधारेपासून सुरुवात करत आहे. हा शैक्षणिक उपक्रम निश्चितच गौरवास्पद आहे. असे श्री. रावराणे यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी कोंडये गावचे सरपंच श्री ऋतुराज तेंडुलकर, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, नवीन कुर्ली प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित दळवी, रामेश्वर प्रा. वि. का. सोसायटी संचालक विनायक उर्फ काका गोमणे, डामरे तिवरे केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी पवार सर, रामेश्वर नवतरुण मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश हर्याण सामाजिक कार्यकर्ते संजय सरवणकर ,सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे तज्ञ संचालक किशोर कदम, शिक्षक समितीच्या कणकवली तालुका महिला आघाडी अध्यक्ष दर्शना हुंबे, शिक्षक समिती जिल्हा उपाध्यक्ष धीरज हुंबे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कदम, कृष्णा परब, शिवाजी चव्हाण,अरुण पवार तसेच नवीन कुर्ली शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सखाराम हुंबे, प्रिया दळवी, तसेच तालुक्यातील १०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते, या कार्यक्रमाला श्री अच्युत देसाई, श्री मनोज गव्हाणकर ,श्री राजाराम भिसे,श्री दिलीप कदम यांनी मार्गदर्शन केले.
सदरचा मार्गदर्शन वर्ग दिनांक २५ एप्रिल ते १ मे दरम्यान सात दिवस नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे होईल.या उपक्रमामध्ये कणकवली तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव शशिकांत तांबे ,खजिनदार देऊ होळकर ,सहसचिव विनया तांबे, विश्वस्त सुनील कदम ,संजय कदम यांनी केले आहे तसेच या उपक्रमासाठी नवीन कुर्ली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जोशी मॅडम आणि सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले आहे, या सात दिवस होणाऱ्या मार्गदर्शन वर्गासाठी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाकडून सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.












