आडवली भटवाडीत चोरट्यांनी रिक्षा व्यावसायिकाचे घर फोडले

कपाटातील 85 हजाराचे सोन्याचे दागिने झाले लंपास

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आडवली भटवाडी येथील राहणारे रिक्षा व्यावसायिक भवानीप्रसाद सुधाकर मुद्राळे यांच्या घरात 23 रोजी सकाळी 6.30 ते दुपारी 12.30च्या दरम्यान घराचा मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. घरातील कपाट उघडून कपाटातील सुमारे 85 हजाराचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी आचरा पोलीस दाखल झाले होते. आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भवानीप्रसाद मुद्राळे हे रिक्षाचालक नेहमीच आपली रिक्षा श्रावण येथील रिक्षा स्टॅण्डवर भाड्यासाठी लावतात. मुद्राळे हे आडवली येथील घरात पत्नीसमवेत राहतात. मुद्राळे यांची पत्नी काही दिवसा पूर्वी माहेरी गेली होती त्यामुळे मुद्राळे हे भाड्यासाठी श्रावण येथे गेल्यावर घर बंद होते .23 रोजी मुद्राळे यांना सकाळी 6.30 वाजता भाडे असल्याने ते कणकवलीला घर बंद करून गेले होते त्याच दिवशी त्यांची पत्नी माहेरून सुमारे दुपारी 12.30 वाजता घरी परतल्या .आपल्याकडील चावीने घराचा दर्शनी दरवाजा उघडून आल्यावर त्यांना मागील दरवाजा उघडा दिसला. दरवाजा नजरचुकीने उघडा राहिला असल्याचा समज झाल्याने त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी 24 रोजी त्याना कपाटील दागिन्याचा प्लास्टिकचा रिकामा डबा खोलीत बाजूला फेकलेला दिसून आला. त्यानंतर त्यांनी कपाटात उघडून बघितले असता दागिने लंपास झाले असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत आपल्या पतीला सांगितले. व 23 रोजी माहेरहून आल्यानंतरचा घटनाक्रम सांगितला. मुद्राळे यांनी चोरी झाल्याचे लक्षात येताच आचरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या चोरीत मुद्राळे यांचे 85 हजाराचे दागिने लंपास झाले असून त्यात सोन्याचे मंगळसूत्र, चैन, अंगठी, नथ, कानातील झुमके असे दागिने आहेत. आचरा ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा पोलीस चोरीचा तपास करत आहेत.

error: Content is protected !!