ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक आनंद शितोळे साधणार संवाद
कणकवली (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य, लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांचे ठाम पुरस्कर्ते बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्र सेवा दल, सिंधुदुर्ग यांच्या वतीने गोपुरी आश्रम, कणकवली-वागदे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता हा विचारमंथनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक आनंद शितोळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ‘आपल्या धडावर आपलेच डोके…’ या मार्मिक संकल्पनेतून ते सत्ताधाऱ्यांच्या घटनाबाह्य कारभारावर, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि नागरिकांची सजग भूमिका यावर परखडपणे भाष्य करणार आहेत.

समाजमाध्यमांवरून मोजक्या शब्दांत पण नेमकी आणि निर्भीड टीका करणारे आनंद शितोळे हे मनुवादी विचारसरणीविरोधात आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने लेखन करत आले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांचे विचार ऐकण्याची संधी राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून गोपुरी आश्रमात उपलब्ध होणार आहे. कमलताई परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात ‘जल–जंगल–जमीन : काल–आज–उद्या” या विषयाच्या अनुषंगाने पर्यावरण, नैसर्गिक संसाधने आणि त्यांचे लोकशाही संदर्भातील महत्त्व यावर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.
लोकशाही उपासक, घटना रक्षक, धर्मनिरपेक्षता मानणारे आणि सृजनशील सजग नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्र सेवा दल, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.












