खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित खारेपाटण ज्युनियर कॉलेज येथील श्रीमती आशा राजाराम कावळे पॅरा-नर्सिंग कॉलेज खारेपाटणला मुंबई येथील वात्सल्य ट्रस्टचे संचालक विद्याधर साठे ट्रस्टच्या प्रतिनिधी माधवी मुंडे व मानसी मिठबावकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्वागत केले.
खारेपाटण पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नेहमीच खारेपाटण शिक्षण संस्थेमार्फत केला जातो. याचाच एक भाग म्हणून चालू शैक्षणिक वर्षापासून श्रीमती आशा राजाराम कावळे पॅरा-नर्सिंग अभ्यासक्रमाची सुरुवात खारेपाटण ज्युनियर कॉलेज येथे करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रातील विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थेने हे नवीन पाऊल उचलले आहे.
या अभ्यासक्रमासाठी पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. याची दखल घेऊन मुंबई येथील वास्तव्य ट्रस्टचे संचालक व त्यांचे सहकारी यांना कॉलेजला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य क्षेत्रातील विविध संधी व कामाचे स्वरूप याबाबतचे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यां केले. तर विद्यार्थ्यांच्या उत्तम प्रतिसादाबद्दल आणि कॉलेजच्या उत्तम नियोजना बद्दल ट्रस्टने कॉलेज प्रशासनाचे विशेष कौतुक केले. या नवीन अभ्यासक्रमामुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण मिळून त्यांना स्वतःचा पायावर उभे राहण्यासाठी मदत होणार असल्याचे मत यावेळी वात्सल्य ट्रस्टचे संचालक विद्याधर साठे यांनी व्यक्त केले. तर संस्थेच्या या कार्यासाठी पूर्ण सहकार्य व मदतीचे आश्वासन देखील त्यांनी याप्रसंगी दिले.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुलकर, विश्वस्त विजय देसाई, राजेंद्र वरूणकर, सर्व विश्वस्त तसेच प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, यशवंत रायबागकर, श्रीमती आशा राजाराम कावळे पॅरा-नर्सिंग कॉलेजच्या प्रमुख कार्यवाहक सारिका महिंद्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.












