कणकवली (प्रतिनिधी) : श्री ब्राह्मणदेव सेवा मंडळ, असलदे (उगवतीवाडी) यांच्या वतीने माघी गणेश जयंती २०२६ निमित्त गुरुवार दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी श्री गणेश जयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री स्वयंभू ब्राह्मणदेवांच्या कृपाशीर्वादाने हा धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून सकाळी ९.३० ते १०.०० वाजेपर्यंत श्री गणेश पूजन, सकाळी १०.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर ११.३० वाजता महाआरती होणार आहे. दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ३.०० ते ५.०० या वेळेत हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम तर रात्री ७.०० ते ८.०० या वेळेत मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार आहे. रात्री ८.०० ते १०.०० या वेळेत स्थानिक भजने सादर करण्यात येणार आहेत.
तसेच रात्री १०.०० वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला असून यामध्ये बुवा. संतोष जोईल, श्री भुतेश्वर प्रसादिक भजन मंडळ, खुडी देवगड आणि बुवा – व्यंकटेश नर, श्री निनादेवी प्रसादिक भजन मंडळ, उंडील यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना असणार आहे.
हा सर्व कार्यक्रम श्री गणेश मंदिर, असलदे (उगवतीवाडी) येथे होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ब्राह्मणदेव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.













