खारेपाटण महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तनया पांचाळ प्रथम

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणारे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व सर्धेत एस. एस. पी. एम. इंजिनियअरिंग कॉलेज कणकवलीची विद्यार्थीनी तनया गणेश पांचाळ हिने सुंदर सादरीकरण करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले आहे.

या स्पर्धेला राज्यभरातील युवा वक्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. तर या स्पर्धेचे उद्घाटन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खारेपाटण हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्रीकृष्ण पाटणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संस्था संचालक डॉ. ए. डी. कांबळे, संस्थेचे सचिव महेश कोळसूळकर, सहसचिव राजेंद्र वरूणकर, खजिनदार संदेश धुमाळे तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक याबरोबरच खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय सानप व पर्यवेक्षक संतोष राऊत हे उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण पाटणकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात परिस्थितीशी जुळवून घेणारा, विचारशील व जबाबदार युवा वक्ता घडणे ही काळाची गरज असून तो राष्ट्रविकासासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन केले. या स्पर्धेत एकूण २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. तर या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विजेते ठरलेले स्पर्धक पुढील प्रमाणे :-
१) प्रथम क्रमांक – तनया गणेश पांचाळ, एस. एस. पी. एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवली
२) द्वितीय क्रमांक – सानिया उदय यादव, वंझारे कॉलेज, लांजा
३) तृतीय क्रमांक – अथर्व विवेक पाध्ये
४) उत्तेजनार्थ – माधवी सुरज शेंगाळे व हर्षाली श्रीधर कानडे, खारेपाटण महाविद्यालय

तर या स्पर्धेसाठी “भारतीय न्याय व्यवस्थेची विश्वासार्हता”, “मीडिया : सत्याचा आवाज की सनसनाटीचा बाजार”, विकास व पर्यावरण – आरे ते तपोवन, भारतीय लोकशाही एकाधिकारशाहीच्या दिशेने का? तसेच भारतीय शिक्षणव्यवस्था आणि बेरोजगारी या विषयांवर सखोल विचारमंथन झाले. परीक्षक म्हणून प्रा. वैभव खानोलकर व प्रा. तानाजी गोधडे यांनी काम पाहिले.

या सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तानाजी गोधडे व प्रा. माधवी पांचाळ यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. गजानन व्हंकळी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

error: Content is protected !!