भारतीय सैन्य दलातील सुभेदार मेजर शशिकांत नारकर याला अनोखी मानवंदना
कणकवली काॅलेजमधील बी.काॅम.बॅचच्या सन १९९५-९६ च्या माजी विद्यार्थ्यांचे सलग सहावे गेट टुगेदर रंगले देवगड-तारामुंबरी समुद्र किनारी
आचरा (प्रतिनिधी) : कणकवली काॅलेजमधील सन १९९५-९६ च्या बी.काॅम बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे अर्थातच मैत्री परिवाराचे सलग सहावे गेट टुगेदर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या देवगड – तारामुंबरी येथील निसर्गरम्य अशा ओशियन व्ह्यूव रिसाॅर्टमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मैत्री परिवाराचे हे सहावे गेट टुगेदर चांगलेच अविस्मरणीय ठरले. विशेष म्हणजे भारतीय सैन्य दलातील सुभेदार मेजर शशिकांत नारकर यांचे दिमाखदार स्वागत करण्यात आले आणि योगा नृत्य हे यावेळचे खास आकर्षण ठरले.
काॅलेज जीवन संपून ३० वर्षे पूर्ण झाली…पण पुनर्मिलनात पुन्हा तीच मैत्री, तेच हसणे, खिदडणे, चेष्टा, मस्करी आणि तोच आपलेपणा, मैत्री भाव आणि कौंटुबिक नात्यातील स्नेह अनुभवायला मिळाला. जुने मित्र मैत्रिणी, जिगरी दोस्तांना पुन्हा भेटण्याचा क्षण खूप हृदयस्पर्शी होता. ३० वर्षांनंतरही आपली दोस्ती तितकीच ताजी, तवाणी आणि मनापासून जाणवणारी… आज पुन्हा कळलं, खरे मित्र वेळ विसरत नाहीत. एकेकाला बघताना असं वाटत होतं… वेळ बदलली, पण आपल्यातील मैत्री त्यापेक्षाही अधिक घट्ट विणलेली. काॅलेज जीवनातील मित्र म्हणजे आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे ॲड्रेस बुक…ती पाने पुन्हा उघडली गेली आणि मनात आनंद भरून आला.
मैत्री परिवारातील मित्रमैत्रिणींना एकत्रित आणून एकमेकांना भेटणार यांचे औत्सुक्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण करता यावा.तसेच काही आनंदाचे क्षण मनसोक्तपणे एकत्रितपणे घालविता यावेत.जेणेकरुन त्यातून जीवनामध्ये नवीन उर्जा मिळेल,उत्साह निर्माण व्हावा हीच या मागील प्रमुख संकल्पना होती. पण म्हणतात ना मैत्रीची ओढ कधी स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे सर्व मित्रमैत्रिणींना सहाव्या गेटटूगेदरचे वेध अगोदरच लागले होते आणि पंचावन्न मित्र मैत्रिणी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते.
काहींनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून आयोजनापर्यंत सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. ती उत्तमपणे पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले त्यात प्रामुख्याने महेंद्र सांब्रेकर, संजय खानविलकर, जयराम डामरे, संतोष घाडीगांवकर, दीपा नारकर,समिता मुंज, गीता पाटकर, सुरेखा मेजारी, यांनी विशेष मेहनत घेतली. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी तसेच अन्य ठिकाणाहून व जिल्ह्यातील विविध भागामध्ये नोकरी, धंदा, व्यवसायामध्ये बिझी असणाऱ्या मित्रमैत्रिणी निव्वळ मैत्रीच्या ओढीने एकत्रित झाल्या होत्या.सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे यासाठी काही मित्र-मैत्रिणींनी सर्वांशी संपर्क साधून मैत्रीसेतू बनण्यासाठी आग्रही भूमिका बजावली.आपल्या मित्र-मैत्रिणींचे चांगले मनोरंजन व्हावे तसेच सर्वांची राहण्याची जेवणाची आणि येण्या-जाण्याची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी योग्य नियोजन केले होते.
कार्यक्रम स्थळी राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. चहा,नाश्ता,जेवण यामध्येही वैविध्यता ठेवण्यात आली होती.तसेच कणकवली वरुन नियोजित देवगड तारामुंबरी याठिकाणी येण्याजाण्यासाठी काही मित्रांनीच आपल्या चारचाकी वाहनांची सोय उपलब्ध करून दिली होती.
पहिल्या दिवसाची सुरुवातीला तारामुंबरी येथील विठ्ठल मंदिराचे दर्शन तसेच निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यात बोटिंगचा सुर्यास्त दर्शनाचा आनंद घेतला. त्यानंतर दीपप्रज्वलन आणि सौ.दीपा नारकर हीने शंख नाद करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मैत्री परिवारातील ज्या मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस झाले त्या सर्वांचा एकत्रितपणे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर गेटटूगेदरला पहिल्यांदाच उपस्थित राहिलेल्या भारतीय सैन्य दलातील सुभेदार मेजर पदावरती कार्यरत असणारा मित्र शशिकांत नारकर त्याच्यावरती पुष्पवृष्टी करुन देशभक्तीपर गीतावरती त्याला अनोखी सलामी देण्यात आली. त्याचबरोबर योगगुरू दीपा नारकर या दोघांचा शाल, श्रीफळ, गुलाबाच्या कलमाची कुंडी आणि भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या स्वागताने शशिकांत नारकर देखील भारावून गेले होते. दीपा नारकर हीने अप्रतिम असे योगा नृत्य सादर करुन सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. तसेच योगा टीमने संगीताच्या तालावरती सुंदरसा चंद्र नमस्कार हा योग नृत्याविष्कार सादर केला. त्यानंतर कराओके मराठी, हिंदी गाण्याची सुरेल मैफिल रंगली होती. यामध्ये अनेक मित्र मैत्रिणींनी गाण्यांची सुरेल मैफल रंगवली. त्याला रसिकांनी देखील टाळ्यांची व शिट्टयांची उत्स्फूर्तपणे दाद दिली. तसेच सुधीर कदम आणि इतर मित्रांनी ग्रुपसाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या मित्र मैत्रिणींचा शाल, श्रीफळ, आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. यावेळी सर्वांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ड्रेस कोड करण्यात आला होता.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात गप्पागोष्टी मारत समुद्र किनारी फिरण्याचा आनंद घेतला. तसेच योगगुरू समुद्र किनाऱ्यावरती दीपा नारकर हीने योगासने करुन घेतली. त्याचबरोबर काही प्रत्यक्षात प्रात्यक्षिके दाखवली. त्यानंतर चहा, नाष्टा तसेच कुणकेश्वर मंदिर आणि दाभोळे येथील गणपती मंदिर दर्शनाचा आनंद घेण्यात आला.
मागील वर्षी न आलेल्या मित्रमैत्रिणींना मैत्री पुष्पांचे पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच मैत्री भेट म्हणून दिलेल्या दोन गुलाब कलमाचे रिसॉर्टच्या परिसरात सुभेदार मेजर शशिकांत नारकर तसेच शोभा राणे, दिपा नारकर, अस्मिता खोत, सुशिला राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर क्रिकेट, संगीत खुर्ची, एका मिनिटात फुगे फुगवून फोडणे, स्ट्राॅ केसात रोवणे, योगाच्या पोझिशन आदी स्पर्धा खेळण्याचा आनंद घेण्यात आला. विजेत्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर दुपारचे स्नेह भोजन झाल्यावरती ग्रुपची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये पुढिल वर्षीच्या गेटटूगेदरची तारीख २३,२४ जानेवारी २०२७ ही निश्चित करण्यात आली. त्याचबरोबर अन्य विविध प्रश्नांवरती सकारात्मक चर्चा करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय वाळके, मनोज निग्रे, जयराम डामरे यांनी केले.
दोन दिवस आपल्या रोजच्या व्यापातून व ताण तणावातून मुक्त होत आनंदात, मजेत, धमाल मस्तीत गेल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सर्वांनाच आपआपल्या घरी परत जाण्यासाठी परतीचे वेध लागले. पुढच्या वर्षी असेच पुन्हा एकदा भेटण्याचा निश्चय करून सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन मार्गस्थ झाले.
या गेटटूगेदरमध्ये प्रामुख्याने महेंद्र सांबरेकर, जयराम डांबरे, संजय खानविलकर, भारतीय सैन्य दलातील सुभेदार मेजर शशिकांत नारकर, शांताराम पाताडे, संजय सावंत, अजय वाळके, संतोष घाडीगावकर, रामचंद्र सुकाळे, शरद राणे, मधुसुदन राणे, संतोष तळेकर, सुरेश मांजरेकर, अजित लाड, प्रदिप धुरी, संतोष दळवी, महादेव तेली, सुधीर सावंत, संतोष तवटे, मनोज निग्रे, शंकर गोसावी, मंगेश वाळिंबे, सुनील रावराणे, विनायक कुडतरकर, आत्माराम पडते, मनोज सावंत, किशोर राऊत, सुधीर कदम, शशिकांत साटम, विश्वास जाधव, संतोष राणे, राजेंद्र जाधव, संजय राणे, समिता मुंज-ढवण, दीपा नारकर, गीता पाटकर, सुरेखा मेजारी, विशाखा (राणी) वळंजू, प्रफुल्लता राणे, वैशाली सावंत, अर्चना मोरजकर, दीपा नाडकर्णी, प्रणिता गावडे, मीना पारकर, रत्नप्रभा तावडे, वनिता मुंज, ज्योत्स्ना मेस्त्री, वैशाली कोरगांवकर, अस्मिता खोत, शोभा राणे, सुशिला राणे, दिना तेली, खुशी राऊळ आदी मैत्री परिवारातील मित्रमैत्रिणी सहभागी झाले होते.












