वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ५० जिल्हा परिषद सदस्य व सर्व पंचायत समिती सदस्य निवडून जिल्हा परिषद पुन्हा एकदा राणे साहेबांच्या ताब्यात देऊया. असे भावनिक आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
वैभववाडी भाजपा कार्यालयासमोर आयोजित जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेत पालकमंत्री राणे बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, बँक संचालक दिलिप रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे,प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, प्राची तावडे, शारदा कांबळे, स्नेहलता चोरगे, तसेच भाजपा महायुतीचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यात गेली 27 वर्षे जिल्हा परिषदेवर खासदार नारायण राणे यांची एक हातीसत्ता राहिली आहे. तर वैभववाडी तालुका हा खासदार नारायण राणे यांचा नेहमीच बालेकिल्ला राहिला आहे. तालुक्याने नेहमीच राणेसाहेबांना खंबीर साथ दिली आहे. ही निवडणूक खासदार राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे सर्व उमेदवार हे त्यांनी दिलेले उमेदवार आहेत. बिनविरोध उमेदवाराचा नवा पॅटर्न सिंधुदुर्गने राज्यात निर्माण केला आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. विकासाची, निधीची चिंता तुम्ही सोडा, तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत.
उबाठा सेनेची जिल्ह्यात केविलवाणी स्थिती आहे. त्यांना उमेदवारच मिळत नाहीत अशी गंभीर अवस्था आहे. उबाठा सेनेने कोणताही विकास केलेला नाही. साध्या रस्त्यासाठी कार्यकर्ते चाळीस वर्षे झगडत आहेत. परंतु ते देऊ शकले नाही. त्यामुळे उबाठा सेनेत कार्यकर्ते हताश झालेमुळे भाजपाचा विकासाचा झंझावात पाहून उबाठाचे कार्यकर्ते भाजपात प्रवेश करीत आहेत. विकासासाठी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण योग्य तो मान सन्मान देऊन सांभाळणार आहोत असे पालकमंत्री राणे यांनी सांगितले.यावेळी कोकिसरे, कुंभवडे, हेत येथील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
वैभववाडी जिल्ह्याच्या विकासाचे नवे दालन ठरणारा, वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने कालच्या बजेट मध्ये 3.5 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे खासदार नारायण राणे यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या तीन चार वर्षात हा मार्ग पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय सावंत यांनी केले.












