जीव मुठीत घेऊन, फोंडाघाटच्या वैकुंठभूमीत ग्रामस्थांची उपस्थिती; संताप, चिंता आणि चिता याचा अपूर्व संगम

सुविधा आणि सुशोभीकरणाच्या विकासाची सगळ्यांकडून चिरफाड

फोंडाघाट (प्रतिनिधी) : नावाजलेल्या फोंडाघाट गावातील स्मशानभूमी सुशोभीकरण आणि सुविधांचा गाजावाजा करत, केलेल्या कामांची चिरफाड, अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या ग्रामस्थांच्या समोर निसर्गानेच केली आणि पत्रे फडफडू लागले. त्यामुळे जमलेल्या नागरिकांना व आप्तेष्टांना जीव मुठीत घेऊन अथवा सुरक्षित ठिकाणी उभे राहून भाग घ्यावा लागला. पाण्याची टाकी आहे, परंतु लाईट कनेक्शन्स जमीनदोस्त ! त्यामुळे कसरत करत जवळच्या नदीतून पाणी आणावे लागते. शेड आणि परिसराची स्वच्छता तर विचारूच नका? लोक जमतात. खंत व्यक्त करतात. संताप दर्शवतात आणि शिरडाला पाय लावून विषयाचे गांभीर्य विसरतात.

स्मशानभूमीतील सुविधा आणि सुशोभीकरणाचा लाखो रुपयांचा निधी गेला कुठे? की पेवर ब्लॉक बसवून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न आहे? असा संताप व्यक्त होत आहे. शेड वरील सर्व पत्रे हवेच्या हलक्या झोक्याने असे वाजतात की, खाली उभे असलेले भयभीतीने सुरक्षित ठिकाणी धाव घेतात. याकडे ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष घालून या विकास कामाची चौकशी करावी आणि जनतेसाठी स्वच्छ आणि पवित्र वैकुंठ भूमी निर्माण करावी अशी मागणी जोर धरत आहे.

error: Content is protected !!