वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील दोन जिल्हा परिषद व पाच पंचायत समिती गणासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. निवडणूक साहित्य वितरण व जमा करण्यासाठी तहसीलदार कार्यालय वैभववाडी येथे भव्य मंडप उभारण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्र व इतर साहित्य घेऊन अधिकारी व कर्मचारी रवाना झाले आहेत. यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे.
पंचायत समिती, जिल्हा परिषदेसाठी शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून त्याची पूर्व तयारी प्रशासनाकडून सुरु आहे. तालुक्यात एकूण 58 मतदान केंद्र असून या प्रत्येक केंद्रावर चार निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर कायदा सुव्यस्थेसाठी दोन पोलीस कर्मचारी असे एकूण सहा जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. तर आठ झोनल ऑफिसर नेमण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 6 पथके तयार ठेवण्यात आली आहेत.
मतदान पेट्या वितरणासाठी आठ एस. टी. बस त्याचप्रमाणे दोन जिप गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर प्रत्येक मतदान केंद्रावर प्राथमिक उपचारासाठी आशा स्वयंसेवक तैनात करण्यात आल्या आहेत. निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी दिली आहे.
मतदान शांततेत होण्यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस हवालदार व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६ पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच 225 पोलीस, होमगार्ड कार्यरत आहेत.












