आंबा बागायतदारांना तातडीने आर्थिक मदत द्यावी

माजी उपसभापती नूतन पंचायत समिती सदस्य रविंद्र तिर्लोटकर यांचे निवेदन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांना हवामान बदलामुळे झालेल्या मोठ्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सरकारी मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी उपसभापती व नूतन पंचायत समिती सदस्य रविंद्र तिर्लोटकर यांनी नामदार सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यावर्षी सततच्या हवामान बदलामुळे आंबा बागांमध्ये आलेल्या मोहरावरील कणी मोठ्या प्रमाणात गळून पडली. अनेक शेतकऱ्यांनी सात ते आठ वेळा फवारण्या करूनही अपेक्षित फळधारणा झाली नाही. परिणामी फवारणीसाठी केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने सरासरी २० ते ३० लाख रुपयांपर्यंत औषधांवर खर्च केल्याचे निवेदनात नमूद आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले असून, भविष्यात कोणत्याही बागायतदारावर आत्महत्येसारखी टोकाची वेळ येऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक आंबा बागायतदारास किमान पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी ठोस मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

याबाबत नामदार सुरेश प्रभू यांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मक भूमिका दर्शवली असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा करून आंबा बागायतदारांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.आंबा बागायतदारांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती तिर्लोटकर यांनी दिली.देवगड तालुका हा हापूस आंब्याच्या उत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध असून, यावर्षीच्या प्रतिकूल हवामानामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बागायतदार वर्गात चिंतेचे वातावरण आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!