कोकणच्या सागरी इतिहासाला नवा पुरावा : खारेपाटणमध्ये नौकायुद्धाची नोंद

खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकण इतिहास परिषदेचे १५ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन वसई येथे नुकतेच पार पडले. या अधिवेशनात प्रकाशित झालेल्या ‘कोकण इतिहास पत्रिका’ (जानेवारी २०२६, अंक १) मध्ये खारेपाटण येथील प्राचीन नौकायुद्धासंबंधीचे महत्त्वपूर्ण संशोधन प्रसिद्ध झाले असून, त्याची इतिहास अभ्यासकांमध्ये विशेष चर्चा सुरू आहे.

मुरारी भालेकर आणि ऋषिकेश जाधव या स्थानिक अभ्यासकांनी इतिहास संशोधक डॉ.अंजय धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण परिसरातील ऐतिहासिक वारशाचा अभ्यास केला. कपिलेश्वर, कालभैरव मंदिर परिसरातील सतीशिळा आणि वीरगळांचा सखोल अभ्यास करताना एका वीरगळावर कोरलेले नौकायुद्धाचे जिवंत दृश्य त्यांच्या निदर्शनास आले. या शिल्पात दोन नौकांमधील संघर्ष, शस्त्रधारी योद्धे आणि समुद्रातील युद्धाचे चित्रण स्पष्टपणे दिसून येते. यावरून खारेपाटणमध्ये सागरी लढाया झाल्या असल्याचा ठोस पुरावा मिळाला आहे.

वीरगळ म्हणजे गाव किंवा प्रदेशाचे शत्रूपासून संरक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेली स्मृतीशिळा. अशा शिळांवर त्या वीरांचे पराक्रम, युद्धदृश्ये आणि तत्कालीन समाजजीवनाचे प्रतिबिंब कोरलेले असते. खारेपाटणमधील या वीरगळाच्या शिल्पशैलीवरून हे नौकायुद्ध साधारण बाराव्या शतकाच्या मध्यकाळात घडले असावे, असा अंदाज डॉ. धनावडे यांनी व्यक्त केला आहे. परिसरातील सतीशिळा मात्र तुलनेने नंतरच्या काळातील असल्याचेही त्यांनी नमूद केले, ज्यामुळे या भागात विविध ऐतिहासिक टप्प्यांमध्ये घडामोडी झाल्याचे स्पष्ट होते.

खारेपाटणचे प्राचीन महत्त्व यापूर्वीही इतिहासकारांनी अधोरेखित केले आहे. महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी येथे सापडलेल्या दक्षिण शिलाहारकालीन ताम्रपटांचे वाचन करून ‘बलिपट्टन’ हेच आजचे खारेपाटण असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच खारेपाटण हे दक्षिण शिलाहारांची राजधानी होते, असे त्यांनी नमूद केले आहे. ताम्रपटात बंदरात येणाऱ्या व्यापाऱ्यांना करमाफी देण्याचा उल्लेख आढळतो. यावरून सुमारे हजार वर्षांपूर्वीपासून खारेपाटण हे सागरी व्यापाराचे प्रमुख केंद्र होते आणि विजयदुर्ग–खारेपाटण–चिंचवली बावडा या व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे स्थान म्हणून विकसित झाले होते.

वीरगळ,ताम्रपट आणि उपलब्ध ऐतिहासिक संदर्भ एकत्रितपणे पाहता खारेपाटणचे सागरी, व्यापारी आणि लष्करी महत्त्व ठळकपणे अधोरेखित होते. या नव्या संशोधनामुळे कोकण किनारपट्टीवरील नौकानयन परंपरा, नौका बांधणी तंत्रज्ञान आणि सागरी संरक्षण व्यवस्थेच्या अभ्यासाला नवे परिमाण मिळाले आहे.

डॉ.अंजय धनावडे यांनी सांगितले की, यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, रायगड जिल्ह्यातील उरण तसेच मुंबईतील बोरीवली (एकसर) येथेही नौकायुद्धाचे ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध झाले आहेत. या सर्व पुराव्यांच्या पार्श्वभूमीवर खारेपाटणमधील हा शोध कोकणाच्या सागरी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दुवा ठरत आहे. कोकण इतिहास परिषदेच्या माध्यमातून प्राचीन बंदरे, सागरी व्यापार आणि नौदल परंपरेवर पुढील संशोधन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुर्लक्षित राहिलेल्या या ऐतिहासिक ठेव्याचे योग्य संवर्धन आणि शास्त्रीय जतन झाले, तर खारेपाटण भविष्यात एक महत्त्वाचे ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकते, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.खारेपाटणच्या मातीत दडलेले सागरी वैभव आता शिल्प पुराव्यांच्या माध्यमातून उजेडात येत असून, कोकणाच्या इतिहासाला नवे परिमाण देणारा हा शोध ठरत आहे.

error: Content is protected !!