खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी ऍड. किशोर वरकची न्यायालयात शरणागती

कोर्टाकडून ऍड. वरकचा पोलिसांकडे ताबा

ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी ऍड. किशोर वरक याने कुडाळ येथील न्यायालयात शरणागती पत्करली. खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी सिद्धेश शिरसाट याला मोक्का लावू नये साठी लाखो रुपयांची खंडणी मागून त्यातील काही रक्कम घेतल्याचा गुन्हा ऍड. किशोर वरक विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल होता. या गुन्ह्यात सुप्रीम कोर्टाने आरोपी किशोर वरक याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. तसेच पुढील चार आठवड्यात पोलिसांकडे शरण जाण्याचा आदेश केला होता. नंतर आरोपी किशोर वरक हा कुडाळ न्यायालयात 11 फेब्रुवारी रोजी शरण गेला.

त्यांनतर कुडाळ न्यायालयाने किशोर वरक याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. दरम्यान कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सरकारी वकिलांच्या सहाय्याने न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी ऍड. किशोर वरक गुन्हा तपासकामी न्यायालयात हजर राहावा यासाठी आदेश देण्याची विनंती कुडाळ न्यायालयाला केली. कायदेशीर तरतुदीनुसार पोलिसांची किशोर वरक याला न्यायालयात हजर करण्याची विनंती कुडाळ न्यायाधीशांनी मान्य केली.

त्यानंतर वरील नमूद गुन्ह्यात आरोपी किशोर वरकचा ताबा मिळावा यासाठी पोलिसांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मान्य करत आरोपी वरक याचा ताबा 12 फेब्रुवारी रोजी कुडाळ पोलिसांकडे देण्याचा आदेश केला आहे.

error: Content is protected !!