खारेपाटण नडगीवे बौध्दवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न

ग्रामीण विकास रस्ते व मजबुतीकरण योजनेतून २५ लाख रुपये मंजूर

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगीवे या गावातील बौद्धवाडी या मागासवर्गीय वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून सुमारे २५ लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला असून या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच खारेपाटण जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बाधकाम व वित्त सभापती रवींद्र जठार भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, पंचायत समितीचे विद्यमान सदस्य गुरुप्रसाद शिंदे,नडगीवे सरपंच माधवी मण्यार, उपसरपंच भूषण कांबळे, माजी सरपंच अमित मांजरेकर, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष मोहन पगारे, सुनील जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नडगीवे बौद्धवाडी येथील ग्रामस्थांची गेली बरीच वर्षांपासून असलेली मागणी अखेर पूर्ण झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्याने ग्रामीण विकास व रस्ते मजबुतीकरण करणे या योजनेतून या कामाला विशेष सहकार्य लाभले असल्याचे स्थानिक ग्रामस्थानी सांगितले. तर नडगीवे बौद्धवाडी येथील ग्रामस्थानी खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे व आमदार नीलेश राणे तसेच माजी सभापती बाळा जठार यांचे आभार व्यक्त केले आहेत.



error: Content is protected !!