तळेरे (प्रतिनिधी) : कोकणातील मराठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा वाचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील भौगोलिक स्थितीचे महत्त्वपूर्ण मुद्दे मांडून पटसंख्या व अतिरिक्त शिक्षकांच्या बद्दलच्या धोरणात फेरबदल करण्यास शिक्षण मंत्रालयाला प्रवृत्त केले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग कोकणातील शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या समस्या यावर अभ्यासपूर्ण भूमिका मांडली होती. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील अनेक शाळा, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे वर्ग बंद होण्यापासून वाचवले आहेत. त्याबद्दल शिक्षण संस्था, शिक्षक यांच्या वतीने ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मंच सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय वेतुरेकर, सदस्य अजित कांबळे, कमलाकांत उर्फ बाळू कुबल आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी अध्यक्ष सतीश सावंत सुद्धा उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांना आभाराचे पत्र देत कोकणातील शाळांना आपण वाचवले आहे. शाळा वाचल्या म्हणजेच भावी पिढी साक्ष, सुशिक्षित आणि स्वावलंबी होणार आणि त्यासाठी आपले योगदान अनमोल आहे असे शिष्टमंडळाने पत्रात म्हटले आहे.
ओरोस येथे मोर्चाला सामोरे जात पालकमंत्री नितेश राणे यांनी शिक्षण संस्था आणि शिक्षक यांना शाळेचे वर्ग बंद व्हायला देणार नाही असे सांगितले होते. त्या प्रमाणे पालकमंत्री वागत असल्याने आम्हाला अभिमान वाटतो. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो असे मंचाचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी सांगितले.












