माय भारत सिंधुदुर्गच्या पुढाकारातून राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान व एआय मार्गदर्शन

“विज्ञाननिष्ठ विचार, तंत्रज्ञानसाक्षर युवा आणि सक्षम सिंधुदुर्ग”

तळेरे (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने माय भारत सिंधुदुर्ग या मुख्य आयोजकांच्या पुढाकारातून कणकवली तालुक्यात विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची अंमलबजावणी सिंधू फाउंडेशन, प्रज्ञांगण आणि श्रावणी कंप्युटर तळेरे यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने करण्यात आली. या संपूर्ण मार्गदर्शन उपक्रमासाठी जवळजवळ ९८ विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

कासार्डे ज्युनियर कॉलेज येथे आयोजित सत्रात श्री. दिवाकर पवार यांनी विज्ञान शाखेतील विविध करिअर संधी, संशोधनाची व्याप्ती तसेच विज्ञानाच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक उपयोगाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना विश्लेषणात्मक विचारसरणी, प्रयोगशीलता आणि संशोधनवृत्ती विकसित करण्याचे आवाहन करण्यात आले. विज्ञान हे केवळ शैक्षणिक विषय नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, असे त्यांनी नमूद केले.

श्रावणी कंप्युटर, तळेरे येथे आयोजित सत्रात श्रावणी कंप्युटरचे संचालक श्री. सतीश मदभावे यांनी विज्ञानातील झपाट्याने होणारे बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल कौशल्य विकास याविषयी सखोल मार्गदर्शन केले. AI चा शिक्षण, करिअर नियोजन, प्रकल्पनिर्मिती आणि रोजगारनिर्मितीत कसा परिणामकारक वापर करता येईल, याचे व्यावहारिक विवेचन करण्यात आले. तंत्रज्ञानाचा वापर केवळ उपभोगासाठी नव्हे, तर निर्मिती आणि नवोन्मेषासाठी करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी माय भारत सिंधुदुर्ग या मुख्य आयोजक संस्थेच्या वतीने तसेच सिंधू फाउंडेशन, प्रज्ञांगण आणि श्रावणी कंप्युटर तळेरे यांच्या माध्यमातून सौ. श्रावणी मदभावे यांनी दोन्ही मार्गदर्शकांचे आभार मानले. युवकांना विज्ञाननिष्ठ, कौशल्यसंपन्न आणि भविष्याभिमुख बनविण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय विज्ञान दिनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला चालना देणारा आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम युवा घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

error: Content is protected !!