मालवण समुद्रात पोलिसांची गस्ती नौका बुडाली ; सर्व कर्मचारी सुरक्षित

मालवण (प्रतिनिधी) : येथील समुद्रात आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह उसळलेल्या प्रचंड लाटांमुळे पोलिसांची ‘नेपोलियन’ ही गस्ती नौका बुडाल्याची घटना घडली. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस किनाऱ्यापासून सुमारे १० वाव अंतरावर हा अपघात झाला. सुदैवाने नौकेवरील सर्व कर्मचारी सुरक्षित असून मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ‘नेपोलियन’ ही पोलिस गस्ती नौका सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात नियमित गस्त घालत होती. त्यावेळी समुद्रात जोरदार वारे वाहत असल्याने लाटांचा वेग प्रचंड वाढला होता. गस्तीदरम्यान अचानक आलेल्या उंच लाटांनी नौकेला जबर धक्का दिला. या धक्क्यामुळे नौकेत पाणी शिरू लागले आणि काही क्षणातच नौका समुद्रात बुडू लागली.

नौका बुडत असल्याचे लक्षात येताच पोलिस कर्मचारी आणि खलाशी यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. स्थानिक मच्छीमार योगेश तोंडवळकर यांनी आपली नौका घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मदतीने बचावकार्य राबविण्यात आले.

या बचाव मोहिमेत विल्ली डिसोझा, निल फर्नांडिस, हेमांग जॉयल फर्नांडिस, खलाशी सनी, कुमार, लॉरेन्स, बेंडिट आदींसह इतर मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले. पोलिस व मच्छीमारांनी मिळून नौकेतील कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले.

स्थानिक मच्छीमार आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

error: Content is protected !!