बुरंबावडेच्या शिवशक्ती कबड्डी संघाचा राज्यस्तरीय स्पर्धेत विजय

ओरोस (प्रतिनिधी) : कोरो इंडिया व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला, ट्रान्स महिला आणि युवतींच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील शिवशक्ती कबड्डी संघ, बुरंबावडे या संघाने देदीप्यमान यश संपादन केले आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारत या संघाने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

हा विजय केवळ खेळाचा नसून तो जिद्दीचा आहे. स्त्री विश्व एकल महिला सोशल फाउंडेशन, सिंधुदुर्गच्या संस्थापिका सायली शिवानंद नारकर यांच्या संस्थेतर्फे हा संघ या स्पर्धेत उतरला होता. ग्रामीण भागातील महिलांना क्रीडा क्षेत्रात हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकुन 25 संघ सहभागी झाले होते. विजयी संघात देवगड तालुक्यातील बुरंबावडे गावच्या खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर संपन्न झालेल्या या स्पर्धेत विजेत्या संघाचे नेतृत्व कर्णधार मानसी दुधवडकर यांनी अतिशय संयमाने केले. ​साक्षी मांजरेकर, ​भक्ती पाटणकर, ​सुर्ष्टी बांदिवडेकर, ​निलीमा ताम्हाणकर, ​प्राजक्ता ताम्हाणकर, ​सानिका राणे, ​समिधा वाळवे यांनी या खेळात साथ दिली. ​सामाजिक समरसतेचा संदेश देण्यासाठी ​कोरो इंडियाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत महिलाना सहभागी करून घेण्यात आले होते. अशा समावेशक स्पर्धेत विजय मिळवून शिवशक्ती संघाने सामाजिक समरसतेचा एक मोठा संदेश दिला आहे. बुरंबावडे सारख्या ग्रामीण भागातून येऊन जिल्हास्तरावर आपल्या खेळाचा ठसा उमटवणाऱ्या या खेळाडूंचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

सायली नारकर यांनी या विजयाचे श्रेय खेळाडूंच्या मेहनतीला आणि त्यांच्या जिद्दीला दिले आहे. या यशामुळे संपूर्ण देवगड तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले असून, विजयी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी 25 मार्चला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुंबईला जाणार आहे.

error: Content is protected !!