“वर्षभर खड्डे पडता कामा नयेत; गटारे, पथदीप तातडीने दुरुस्त करा” ऑन फील्ड पाहणीत ठेकेदार फैलावर
कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका असलेल्या कंपनीकडून शहरातील सर्व्हिस रोडच्या डागडुजीचे काम सुरू असताना निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला. याची तात्काळ दखल घेत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शनिवारी रात्री प्रत्यक्ष स्थळी जाऊन कामाची पाहणी करत ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
“डांबरीकरण दर्जेदार झालेच पाहिजे. किमान वर्षभर तरी एकही खड्डा पडता कामा नये,” अशा शब्दांत पारकर यांनी कामगार व संबंधित अधिकाऱ्यांना खडसावले. रोडलगत असलेली गटारे अर्धवट अवस्थेत असल्याने पाणी साचून दुर्गंधी पसरत असल्याचे निदर्शनास आणून देत, तातडीने निचऱ्याची व्यवस्था करून गटारे स्वच्छ करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
नगराध्यक्ष पारकर यांनी यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा करून सर्व्हिस रोडची डागडुजी सुरू करण्यास भाग पाडले होते. मात्र प्रत्यक्ष कामात डांबराची लेअर कमी टाकली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर त्यांनी रात्रीच कामाची झडती घेतली. प्रांताधिकारी कार्यालयासमोर झालेल्या कामावर गौरव हर्णे यांनी निकृष्ट दर्जाचा आरोप केला.
पाहणीदरम्यान पारकर यांनी पुढील सूचना दिल्या, गोकुळधाम येथील ॲड. उमेश सावंत यांच्या घरालगतचे गटार तात्काळ स्वच्छ करावे. सर्व्हिस रोडवरील बंद अवस्थेतील पथदीप सुरू करून जीर्ण दिवे बदलावे. उड्डाणपुलाखालील तुटलेली रेलिंग दुरुस्त करून परिसर सुरक्षित करावा. रस्त्यावर पुन्हा खड्डे पडणार नाहीत, याची हमी द्यावी. दरम्यान, काम तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या हायवे प्राधिकरणाचे व्यवस्थापक भूपेंद्र चौधरी यांनी दिले.
यावेळी कंपनीचे अभियंता रवींद्र गायकवाड यांच्यासह अमेय पारकर, सोहम वाळके, बाबू केणी, गौरव हर्णे आदी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देत प्रत्यक्ष पाहणी करणाऱ्या नगराध्यक्षांच्या आक्रमक भूमिकेमुळे ठेकेदारावर दबाव वाढला असून, शहरातील सर्व्हिस रोड खड्डेमुक्त व सुरक्षित होणार का, याकडे आता कणकवलीकरांचे लक्ष लागले आहे.












