माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांची मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झाला असून आराखड्यावर नागरिकांना हरकत घेण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सदर एक महिन्याच्या मुदतीत वाढ करून आणखी 30 दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनातून केली आहे. निवेदनात कन्हैया पारकर यांनी म्हटले आहे की, सध्या भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर असल्यामुळे गटबुक नकाशा, प्रॉपर्टी कार्ड नंबर,मालमत्ता नकाशे व आवश्यक अभिलेख वेळेत प्राप्त होत नाहीत.विकास अरखड्यावर हरकत नोंदविण्यासाठी सदर कागदपत्रे महत्वाची आहेत. विकास आराखडा पुढील 20 वर्षांसाठी असणार आहे. त्यामुळे नागरिकांना हरकत नोंदविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळण्यासाठी अवधी लागत आहे हे लक्षात घेऊन नागरिकांना संधी मिळण्यासाठी आणखी 30 दिवस मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष पारकर यांनी केली आहे.












