वेंगुर्ला तालुक्यात बारावी निकालात गुणवंत विद्यार्थ्यांची चमक
वेंगुर्ला (प्रतिनिधी) : फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल शनिवारी, २ मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. वेंगुर्ला तालुक्याने यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत ९७.९७ टक्के निकालाची नोंद केली आहे. तालुक्यातील चार कनिष्ठ महाविद्यालयांमधून परीक्षेला प्रविष्ट झालेल्या ६४१ विद्यार्थ्यांपैकी ६२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान बा. म. गोगटे कनिष्ठ महाविद्यालय, शिरोडा येथील एम. सी. व्ही. सी. शाखेची विद्यार्थिनी गायत्री लक्ष्मण वारगावकर हिने ९० टक्के गुण मिळवत पटकावला. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथील वाणिज्य शाखेचा विद्यार्थी पुष्कर विजय पेडणेकर याने ८७.३३ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तर याच महाविद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी स्नेहा राजन नार्वेकर हिने ८५.३३ टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला. खर्डेकर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची मृण्मयी दिनकर परब हिने ८५ टक्के गुणांसह तालुक्यात चौथा क्रमांक मिळविला. तसेच शिरोडा येथील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी सलोनी नितीन बागवे हिने ८३.६७ टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. तालुक्यातील काही महाविद्यालयांनी शतप्रतिशत निकालाची कामगिरी नोंदविली. श्री देवी सातेरी हायस्कूल व कै. सौ. गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय, वेतोरे येथील सर्व १०६ विद्यार्थी उत्तीर्ण होत महाविद्यालयाने १०० टक्के निकाल मिळविला. तसेच रा. कृ. पाटकर हायस्कूल आणि रा. सी. रेगे कनिष्ठ महाविद्यालय, वेंगुर्ला येथील तीन विभागांतील सर्व ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बा. म. गोगटे कनिष्ठ महाविद्यालय, शिरोडा येथे २३७ विद्यार्थ्यांपैकी २३४ विद्यार्थी उत्तीर्ण होत ९८.७३ टक्के निकाल लागला. तर बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे २५७ विद्यार्थ्यांपैकी २४७ विद्यार्थी उत्तीर्ण होत ९६.११ टक्के निकालाची नोंद झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन डॉ. सौ. मंजिरी मोरे, कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.













