केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री करणार उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस यांसह दिग्गज मंत्र्यांची लाभणार उपस्थिती.
सिंधुदुर्गातून ॲड. नकुल पार्सेकर, डॉ. संतोष राणे, प्रा. रुपेश पाटील आमंत्रित.
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘यशदा’ या प्रशिक्षण केंद्रांनंतर एमआयटी, पुणे व राष्ट्रीय सरपंच संसदचे सर्वेसर्वा डॉ. राहुल कराड यांच्या संकल्पनेतून दौंड, पुणे येथे तब्बल दोनशे एकर जागेत लाईफ ट्रान्सफॉर्मॅशन सेंटर व राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केलेली असून पाचशेहून जास्त जणांची निवास व्यवस्था होईल, अशी निवासस्थाने आणि पाच हजार लोकांची क्षमता असलेले अद्ययावत सभागृह उभे केलेले असून या ग्राम विकासाचे प्रशिक्षण देणार्या या आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणाऱ्या या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर व राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन देशाचे कृषी, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री शिवराजसिंह चौहाण हे करणार असून यावेळी विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, योगगुरू रामदेवबाबा, ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, एमआयटीचे संस्थापक विश्वनाथजी कराड, पद्मश्री पोपटराव पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून अडीच हजारांहून जास्त सरपंच, उपसरपंच आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून केंद्र व राज्य सरकारकडून ग्रामीण विकासासाठी विविध योजनांसाठी येणाऱ्या निधीची विनियोग व गावाचा शाश्वत विकास करताना येणाऱ्या अडचणी यावर मंथन होणार आहे.
महाराष्ट्रात एकूण अठ्ठावीस हजारांहून जास्त ग्रामपंचायती आहेत ग्रामपंचायत हे ग्रामीण विकासाचे डोळे असतात अशावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींना योग्य प्रशिक्षण दिल्यास स्वयंपूर्ण गावांची महात्मा गांधीची संकल्पना पूर्ण होवू शकते यामुळे एम.आय. टीचे सर्वेसर्वा डॉ. राहुल कराड यानी दुरद्रुष्टीने हे भव्य दिव्य संकुल उभारले असून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसाठी हे एक विद्यापीठच आहे.
या उद्घाटन सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राष्ट्रीय सरपंच संसदेचे कोकण विभागीय अध्यक्ष डॉ. संतोष राणे, कोकण व नाशिक प्रांत अध्यक्ष अँड. नकुल पार्सॅकर व प्रचार व प्रसार विभाग प्रमुख प्रा. रुपेश पाटील यांना निमंत्रित केलेले असून महाराष्ट्रातील तमाम सरपंच, उपसरपंच व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन एमआयटी व राष्ट्रीय सरपंच संसदेचे कार्याध्यक्ष व प्रमुख समन्वयक श्री. योगेश पाटील यांनी केले आहे.












