खारेपाटण येथे कार आणि ट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात युवती ठार तर युवक गंभीर जखमी

होळीच्या दिवशी सख्ख्या बहिण-भावावर ओढवला काळ

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण नजीकच्या नडगिवे धुरीभाटले वाडी बस स्टॉप जवळ आज मंगळवार दि. ३ मार्च २०२६ रोजी भर दुपारी १२.३० च्या सुमारास कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात खारेपाटण जिजामातानगर येथील तनिषा पुरुषोत्तम शेट्ये (वय – १८) ही जागीच ठार झाली. तर भाऊ ऋतुपर्ण पुरुषोत्तम शेट्ये (वय – २३) हा गंभीर जखमी झाला आहे. ऐन होळी आणि शिंमग्याच्या सणाच्या वेळी या दोन बहिण-भावडांवर अशाप्रकारे आघात झाल्यामुळे खारेपाटण मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खारेपाटण जिजामातानगर येथील रहिवासी असलेले पुरुषोत्तम शेट्ये हे एसटी महामंडळामध्ये चालक म्हणून नोकरी करत असून तनिषा व ऋतुपर्ण ही त्यांची दोन मुले होत. आज होळीचा सन असल्याने खारेपाटण मध्ये सर्व लोक गाव होळीच्या उत्सवात सहभागी होते. यामध्ये ऋतुपर्ण हा देखील सहभागी होता. दरम्यानच्या काळात ऋतुपर्ण घरी आला व आपल्या घरातील जुनी अँबेसिडर मोटर कार क्र. MH09 AB4339 ही घेऊन खारेपाटण येथून तळेरेच्या दिशेने जात असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगीवे धुरीभाटलेवाडी येथील बस स्टॉप जवळ रस्त्याच्या बाजूला उभा असलेला भारत बेंझ कंपनीचा व अभिजित प्रमोद वैद्य (रा. रत्नागिरी नाखरे) यांच्या मालकीचा अवजड ट्रक वाहन क्र. MH08 AP4249 याचे वाहन चालक गणेश शशिकांत पाष्ट्ये राहणार नडगीवे हे आपला ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबवून घरी जेवायला गेले असता त्यांच्या उभ्या गाडीला ऋतुपर्ण याने कारचा ताबा सुटल्यामुळे पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमध्ये ऋतुपर्ण याच्यासोबत असलेली त्याची बहीण तनिषा पुरुषोत्तम शेट्ये हिचा जागीच अंत झाला. तर कारचालक ऋतुपर्ण हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. तर तेथून कोल्हापूर येथे तत्काळ नेण्यात आले आहे.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण ग्रामस्थ मोठ्या संख्येने अपघातस्थळी जमा झाले. मृतदेहासह जखमी यांना बाहेर काढले. तर अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार मिलिंद देसाई, पोलिस हवालदार अवधूत गुणीजन, पो. हवालदार झोरे, पो. हवालदार कदम, वन विभागाचे विजय भोसले हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची पाहणी केली. तर कणकवली पोलीस निरीक्षक पवन कांबळे, पो. हवालदार राजेश गायकवाड यांनी देखील अपघात स्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. तात्काळ अपघात स्थळाचा पंचनामा केला. तसेच अपघाताची माहिती मिळताच माजी जि. प. सदस्य रवींद्र जठार, जि. प. सदस्य प्राची ईसवलकर, पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये, भाऊ राणे तसेच ग्रामस्थानी घटनास्थळी जाऊन मदत केली.

दरम्यान या अपघातातील मृत तनिषा पुरुषोत्तम शेट्ये हिचा मृतदेह खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवघरात ठेवण्यात आला असून शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलिस व कणकवली पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी करीत आहे.

error: Content is protected !!