वैभववाडीत होळी उत्सवाची धूम; ग्रामदैवतांच्या पालख्या मांडावर विराजमान..

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात मोठ्या उत्साहात सोमवारपासून होळी उत्सवाला सुरुवात झाली असून गावागावांत सणाचे मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक गावातील मांडावर (चव्हाट्यावर) पारंपरिक पद्धतीने होळी उभारण्यात आली असून मंगळवारी सायंकाळी ग्रामदैवतांच्या पालख्यांचे ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत आगमन होणार आहे.

गावागावच्या रूढी-परंपरेनुसार पाच, सात दिवसांपासून ते अगदी गुढीपाडव्यापर्यंत देवाच्या पालख्यांचा मांडावर मुक्काम असणार आहे. या कालावधीत दररोज रात्री ढोल-ताशांच्या गजरात पालखी नृत्य रंगते. गोमू नृत्य, डफलीच्या तालावर खेळे नृत्य तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून जाते.
काही गावांत देवाची पालखी किंवा देवांचे निशाण घरोघरी नेण्याची परंपरा आहे. ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने घरी आलेल्या देवाची पूजा-अर्चा करून नवस व्यक्त करतात. तसेच काही गावांतील देवाच्या पालख्या परस्पर नाते-संबंधातील देवांच्या भेटीस जातात. दोन पालख्यांच्या भेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते.

होळी उत्सवाच्या निमित्ताने पुणे, मुंबईसारख्या शहरांतून चाकरमानी मोठ्या संख्येने गावी दाखल झाले आहेत. वर्षभर बंद असलेली घरे उघडली असून नातेवाईक, मित्रमंडळी व माहेरवाशिणींच्या आगमनामुळे घराघरांत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून भाविक होळीदेवाला नवस बोलत असून संपूर्ण तालुका सणोत्सवात रंगून गेला आहे.

error: Content is protected !!