नागरिकांसाठी विविध दाखले वितरण
वैभववाडी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर योजनेअंतर्गत पहिला टप्प्याला खांबाळे येथून सुरुवात होत असून हा कार्यक्रम खांबाळे केंद्र शाळा नंबर एक येथे दिनांक 7 मार्च रोजी होणार आहे. या शिबिरात प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, अभिलेखांमध्ये दुरुस्ती करणे, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, असे विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात येणार आहेत. तरी सदर सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी केले आहे.
या अभियानाचा प्रमुख उद्देश लोकाभिमुख प्रशासन राबविणे महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोचवून सेवा देणे, गतिमान करणे, तक्रार निवारण करणे, डिजिटल सेवांचा वापर प्रभावी करण्यासाठी प्रसिद्धी देणे हा आहे. अशाच प्रकारचे राजस्व अभियान तालुक्यात होणार असून दिनांक 14 मार्च रोजी भुईबावडा मंडळामध्ये ग्रामपंचायत कार्यालय भुईबावडा येथे होणार आहे. तर 10 एप्रिल रोजी कुसूर मंडळामध्ये कार्यक्रम होणार असून हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी विद्यामंदिर कुसुर येथे होणार आहे. तर दिनांक 17 एप्रिल रोजी एडगाव मंडळामध्ये शिबीर होणार असून हे शिबिर माधवराव पवार विद्यालय कोकिसरे येथे आयोजित करण्यात आले आहे. 8 मे 2026 रोजी वैभववाडी मंडळामध्ये आनंदीबाई रावराणे महाविद्यालय सभागृहामध्ये नगरपंचायत क्षेत्रासाठी शिबिर होणार आहे. तरी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











