गुढीपाडव्यापासून वैभववाडी–सडूरे मार्गे कुर्ली नवी एसटी बस फेरी सुरू

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी-सडूरे मार्गे कुर्ली अशी नवीन एसटी बस फेरी येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिनांक १९ मार्च पासून सुरू करण्यात येईल असे आश्वासन कणकवली आगार व्यवस्थापक श्री. कदम यांनी दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांच्या मागणीला यश आले आहे. वैभववाडी तालुक्यातील एसटी बसच्या समस्या निवारण करण्यासाठी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी एसटी चे अधिकारी व या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांच्या समवेत तहसीलदार कार्यालय वैभववाडी येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नायब तहसीलदार दिलिप पाटील, कणकवली आगार व्यवस्थापक श्री. कदम, अंबाजी हुंबे, सूर्यकांत पाटील, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी आगार व्यवस्थापक कदम यांनी येत्या 19 तारीख पासून वैभववाडी बस स्थानकातून सायंकाळी चार वाजता वैभववाडी सडूरे मार्गे कुर्ली फोंडा अशी फेरी सुरू करण्यात येईल. तसेच सकाळी नऊ वाजता फोंडा येथून एसटी बस सुटून ती कुर्ली-सडूरे-वैभववाडी अशी येईल असे आश्वासन दिले आहे. ही बस फेरी सुरू झाल्यास त्याचा या मार्गावरील प्रवाशांना लाभ होणार आहे.

वैभववाडी बस स्थानकात सध्या एकच वाहतूक नियंत्रक असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे याठिकाणी दोन वाहतूक नियंत्रक देण्याची मागणी करण्यात आली. यावर बोलतांना आगार व्यवस्थापक कदम यांनी सांगितले, सध्या वाहतूक नियंत्रक पद रिक्त आहेत. लवकरच ही पदे भरली जाणार आहेत. ही पदे भरल्यानंतर बस स्थानकासाठी आणखी एक वाहतूक नियंत्रक देण्यात येईल असे सांगितले.

error: Content is protected !!