वायंगणी गावातील महिलांचा विशेष महिला ग्रामसभेवर बहिष्कार

आचरा (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त शासनाच्या आदेशानुसार मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन रविवार ८ मार्च रोजी करण्यात आले होते. या ग्रामसभेच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. परंतु काही दिवसांपूर्वी घडलेल्या अंतरा हर्षद दुखंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्यामुळे गावातील महिला वर्गामध्ये तीव्र नाराजी आणि संताप आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी गावातील महिलांनी मालवण पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन सदर प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून दुखंडे कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ व अंतरा दुखंडे यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी गावातील महिला वर्गाने आज रविवार ८ मार्च रोजी आयोजित महिला ग्रामसभेवर बहिष्कार घातला.

error: Content is protected !!